वेंगुर्ले – मातोंड येथील कोंब्याची जत्रा


शिवमार्तंड रूपात साकार जाहला.
तो देव माझा घोडेमुख मी मूर्तिमंत पाहिला.
घोड्यावरी स्वार होवून भक्तांच्या हाकेला धावला.
सरसेनापती तू या गावचा.
करूणारूपी ध्यास तयाचा.
तना मनासी गजर तुझ्या नामाचा.
समृद्धीचा अखंड निर्झर तू नाम तुझे शिवशंकर.
भक्तांनी फुलूनी गेला डोंगर अवघा, उसळला भक्तीचा जनसागर.

सिंधुदुर्गातील सावंतवाडी-मळेवाड मार्गावरून ये-जा करणारे भक्तगण आवर्जून जिथे नतमस्तक होतात, त्या श्री देव घोडेमुखाची जत्रा रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली या चतु:सीमेवरचं हे एक जागृत देवस्थान मानलं जातं.

तळकोकणतील जवळ जवळ सर्व रहिवाशांना ह्या देवस्थानचे महात्म्य आणि प्रथा माहीतच आहे. आमचे ईतर वाचक जे कोकणातील प्रथा आणि रीतीरिवाज जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्या साठी कोकणाई एक छोटासा प्रयत्न.

श्री देव घोडेमुखाची जत्रा म्हणजे लोकार्थानं ‘कोंबड्यांची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही जत्रा या परिसरातील भाविकांची श्रद्धा आणि परंपरेचं द्योतक आहे. हजारो भाविक या जत्रेदिवशी दूरवरून येतात. या जत्रेत रणरणत्या उन्हातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. भाविकांच्या रक्षणासाठी श्री देव घोडेमुखाची कृपादृष्टी नेहमीच भक्तांवर असते. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० ते ९०० मी. उंचीवर हिरव्यागार झाडात डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्री देव घोडेमुख सा-या परिसराचं रक्षण करतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सावंतवाडी-मळेवाड मार्गावरून ये-जा करणारे भक्तगण श्री देव घोडेमुखाकडे नतमस्तक होऊनच पुढे मार्गक्रमण करतात. मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली या चतु:सीमेवर हे जागृत देवस्थान आहे.

मंदिराच्या आत पाषाणमय देवाची मूर्ती, मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. मळेवाड-सावंतवाडी या रस्त्याच्या बाजूला श्री देव घोडेमुखाचा सुंदर मंदिर दिसतं. तिथूनच डोंगरावर मंदिराकडे रस्ता गेला आहे. कधी चढती, कधी वळण तर कधी झाडाला वळसा देऊन हा रस्ता मंदिराच्या तटबंदीपर्यंत जातो. तटबंदीला पायऱ्यांची व्यवस्था आहे. भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने डोंगराच्या पायथ्याशी विहीर खणून पाईपलाईनद्वारे मंदिरापर्यंत पाणी आणून भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच विलोभनीय दृश्य पाहून आलेला थकवा नाहीसा होतो. तटबंदीवरून खाली मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली गावांचा विस्तीर्ण परिसर दिसतो.

या देवस्थानाबद्दल गावात ज्या आख्यायिका ऐकिवात येतात, त्यावरून असे कळते कि एक सत्पुरुष सरदार, जे सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत असत. ते जेव्हा आपल्या घरी परतत (नक्की कुठचे गाव ती माहती उपलब्ध नाही), तेव्हा न्हावेली गावाची सीमा ओलांडून मातोंड-पेंडूर (तेव्हा चे मार्तंडपुरी आताचे मातोंड-पेंडूर), गावात प्रवेश करीत तेव्हा त्यांचा अश्व (घोडा) थबकून उभा राही. काही केल्या पाऊल उचलत नसे. जेव्हा ते त्यावरून पायउतार होत तेव्हा तो अश्व चालू लागे. सातत्याने असे घडू लागल्यावर त्यांनी याबाबत, तेव्हाचे आचार्यगुरु यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना श्री शिव शंकराच्या ह्या रूपाबद्दल दृष्टांत झाला, आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंग रुपी पाषाण, डोंगर माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून त्यांनी तिथेच प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली, त्यामुळे या दैवताला घोडेमुख असे संबोधले गेले. या मातोंड-पेंडूर गावात अश्वावर आरूढ होणे निषिद्ध आहे. इतकेच नाही तर गावातल्या कुणालाही अश्वारूढ होता येत नाही जेणेकरून देवतेचं अपमान होईल. ज्या वनात. (लोकभाषेत जंगलात), श्री घोडेमुखाचे वास्तव्य आहे त्याला “युवराचे रान” असे नाव होते. परंतु श्री घोडेमुख देव स्थापन झाल्यावर, त्याला त्यांच्याच नावे ओळखले जाऊ लागले. जस जसा काळ उलटत गेला, तसतशी देवंस्थानाची कीर्ती सर्वत्र पसरत गेली. गावाच्या परंपरेनुसार पुढे या देवस्थानाचे धार्मिक विधी सुरु झाले.

३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला, तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा, व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंड गावच्या देवस्थानाची देवदीपावली दिवशी, सातेरी मंदिरात मांजी बसते. यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर होत असतो. पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रौत्सवादिवशी, सकाळी गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भुतनाथ व पावणाई या देवांच्या तरंगकाठ्यासह, घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. श्री देव घोडेमुख क्षेत्रात केळी, नारळ, गोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो. भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने, श्री देव घोडेमुखला कोंबड्यांचा मान * (श्री देव घोडेमुख च्या अधिपत्याखाली येणाऱ्या चाळे, भूत – पिशाच्च, गण यांच्यासाठी) * देण्यासाठी दाखल झालेले असतात. भाविक आपल्या मनोकामना गावकऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरूपात श्री देव घोडेमुखाकडे मांडतात.त्यानंतर सायंकाळी खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरुनच श्री देव घोडेमुख चरणी कोंबड्यांचा मान देण्याच्या कार्यक्रमाला सुरवात होते. जवळपास 20 ते 25 हजार कोंबड्यांचा मान या जत्रौत्सवात देण्यात येतो. सायंकाळच्या वेळेस हा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर, पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात. असंख्य भाविकांच्या गर्दीने श्री देव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांचा जत्रौत्सवासाठी मोठा जनसागरच लोटतो. सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्री देव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होते. या जत्रौत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानीही मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात दाखल होतात.

कसे पोहचाल ?

सावंतवाडी आणि वेंगुर्ला बस स्थानकावरून मंदिराकडे ST बस ने जाऊ शकता. दोन्ही स्थानकावरून अंतर साधारणपणे ३० किलोमीटर आहे. रेल्वे ने जायचे असेल तर सावंतवाडी (मळगाव) स्थानकावरून बस किंवा रिक्षाने जाता येईल. अंतर साधारणपणे २० किलोमीटर आहे.

Google Map

Ghodemukh Temple
https://maps.app.goo.gl/kQ8Z3761bS3Cj9GN6

Source

https://indiapl.com/maharashtra/ghodemukhalord-shivas-temple-506983

Photo credit – Google

 

Loading

Facebook Comments Box