Category Archives: ज्ञान आणि मनोरंजन

खेकडा – भजी

हवामान खात्याने कितीही बोंबलून सांगितले तरी, जो पर्यंत गरम गरम कांदा भजी खावीशी वाटत नाही तोपर्यंत मान्सूनला आरंभ झाला आहे असे म्हणता येणार नाही.  हे कुठल्या नियमाच्या पुस्तकात लिहीलेले नाही, पण मराठी माणसाचा ठरलेला शिरस्ता. उकाड्याने हैराण करुन सोडल्यावर निसर्ग पावसाचा शिडकावा सुरु करतो, हळूहळू मान्सून स्थिरावतो मग काही दिवस तो मुक्कामाला राहतो. या दरवर्षीच्या पाहुण्याला मग गरमा गरमा कांदा-भजी चा पाहुणचार हा ठरलेलाच. निमित्त पावसाचे पण चोचले मात्र आपल्या जिभेचे आपण पुरवतो.
गरम गरम कांदा भजी सोबत वाफाळता चहा आणि बाहेर बेभान होऊन बरसणारा पाऊस. हा योग जर शनिवार-रविवार वा सुट्टीच्या दिवशी जुळून आला तर मग काही बघायलाच नको. नाही म्हणायला मुंबई सारख्या मेट्रोसिटी मध्ये प्रत्येक पावसाळा एक हक्काची सुट्टी देऊन जातोच. सकाळी लोकल ट्रेन वगैरे दळणवळणांच्या साधनांनी मान टाकली की सुरुवातीला चाकरमानी बीएमसी वा सरकारच्या नावाने बोट मोडणार, पण काही वेळातच हे सगळे विसरुन अचानक मिळालेल्या या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी प्लॅनींग सुरु करणार, हे नेहमीचेच. बाहेर कंबरभर पाण्यातून कुठे चिकण-मटणाचे शॉप सुरु आहे का याची शोध मोहीम फत्ते करुन किलोभर तरी वशाट घरी येतेच. चिकन-मटण वगैर वगैर…. आता यातील ‘वगैरे-वगैरे’ चा अर्थ तुम्हाला कळला असणारच. जे ‘वगैरे वगैरे’ चे शौकिन असतात ते आपली सोय बरोबर करतातच म्हणा.
पावसात भिजणे, चिकन-मटण, ‘वगैरे-वगैरे’ हे ज्याची त्याची आवड त्याप्रमाणे बेत असतील. पण शाकाहारी-मांसाहारी लोकांचा कॉमन प्लॅन म्हणजे कांदा-भजी आणि वाफाळता चहा. नाही म्हणायला घरात बेसण, कांदा, मिरची, तेल हे पदार्थ असतातच, त्यामुळे कांदा-भजी बनायला काही वेळ लागत नाही. यावर्षी तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठलाय पण त्यामुळे कांदा भजीच्या बेतामध्ये काही विघ्न येईल असे काही वाटत नाही. नाही म्हणायला यंदा मान्सूनचे आगमान जरा लांबले आहेच. कदाचित प्रसार माध्यमात तेलाचे दर लवकरच उतरतील या बातमीमुळे मान्सून जरा विलंब करत असावा. पण मान्सूना तू काय तेलाच्या दराची काळजी करु नको रे बाबा, तू कोसळायला लागलास की तेलाचे वाढलेल्या भावाची फिकीर करण्याचा करंटेपणा कुणी करत बसणार नाही. गरम गरम कांदा भजी, सोबत तळलेली मिरची आणि वाफाळता चहा हा फस्सक्लास बेत यंदाही आपला शिरस्ता तोडणार नाही.
गृहीणींनो माफ करा, पण तुम्हीही हे मान्य करालच म्हणा, बाहेर टपरीवर मिळणाऱ्या कांदा भजीची सर काही घरच्या भजीला येत नाही. मुसळधार पावसात कुठेतरी आडोशाला सुरु असणारी टपरी चालू दिसली की आनंद गगनात मावेनासा होतो बघा. तीथे आपल्या सारखे शौकिन आधीच जाऊन पोहचलेले असतात, ओ मावशी… ओ दादा… असा आजर्व केल्यानंतर आणि अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर एक प्लेट हातात विसावते. सोबत हिरवी मिरची, लाल-हीरवी चटणी, कांद्याची फोड आणि इतर ग्राहकांचे धक्के खात डिश कधी फस्त होते ह कळतच नाही. तेलकट हात ढुंगनाला पुसून पेमेंटची कार्यवाही पूर्ण करता करता.. बायको-पोरांची आठवण  होते, मग भजीच्या दोन पुड्या घरीही पोहचतात.
भजी हा बाराही महिने महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात मिळणारा पदार्थ. पावसाळ्यात याचे महात्म्य जरी वाढत असलं तरी एरव्हीही भज्यांचा फडशा पाडणे चालूच असते. मुंबईत फोर्ट भागात युनिव्हर्सिटी भजी फेमस. दिवसभर बटाटा वड्या सोबतच कांदा भजी व बटाटा भजी कढईतून परातीत आणि परातीतून गिऱ्हाईकांच्या प्लेट मध्ये अविश्रांत प्रवास सुरुच असतो. 1996 मध्ये मुंबईत नोकरीनिमित्त स्थाईक झाल्यावर ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून या भजीचा महिमा कळला. आपण ज्या विद्यापिठातून पदवी घेतली ते विद्यापिठ आपल्या ऑफिसच्या जवळच आहे हे कळण्या अगोदर इथली भजी प्रसिध्द असल्याचे कळले. माझे मुंबईतल्या कारकिर्दीतले पहिले ऑफिस फोर्टमध्ये हुतात्मा चौकात. या हुतात्मा चौकातच प्याओच्या शेजारी दोन भजीचे स्टॉल होते. डोक्यावर टोपी, पांढरा सदरा आणि लेंगा असा अगदी टीपिकल मराठी वेष असलेला भजीवाला, ज्याचे नाव जाणून घ्यायचा मी कधीच प्रयत्न केला नाही, पण मुंबईतील सुरुवातीची तब्बल दोन वर्षे माझ्या नाष्ट्याची व्यवस्था करत होता. दिड-दोन रुपयात गरमा गरम भजी, सोबत गोड-तिखट आणि लाल चटणी असा मस्त बेत असायचा. एका प्लेटमध्ये खोबऱ्याचे तुकटेही ठेवलेले असायचेत. एक प्लेट भजी व दोन पाव साठी दोन भजी-पाव पेक्षा जास्त पैसे मोजावे लागता हे मध्यमवर्गीयांचे गणित मलाही माहित असल्याने एक भजीपाव संपला की दुसऱ्याची ऑर्डर द्यायची, दोन्ही भजी-पाव संपवून तीथेच प्याओचे थंडगार पानी पिऊन स्वारी जवळच असलेल्या आपल्या कार्यालयात जाऊन विसावायची. 
शिवडी स्टेशनच्या बाहेर पण मस्त भजी-पाव मिळायचा, कदाचित अजूनही मिळत असेल पण गेली कित्येक वर्षे त्या भागात जाणे झाले नाही. नवी मुंबईत मानसरोवर स्टेशनच्या बाहेर मोटर बाईक पार्किंगच्या बाजूला एक हातगाडी उभी असायची. या ताईंच्या हातच्या भजी-पावाचा मोह मला काही आवरता येत नसे. ‘संजू वजन प्रमाणाच्या बाहेर गेलाहा, आता भजी-पाव वगैर सगळाच बंद’…. असं व्हिटी स्टेशनपासून स्वत:लाच समजावणारा मी, आज त्या गाडीकडे ढुंकूणही बघणार नाही असा दृढ निश्चय करायचो. पण बाईक काढण्यासाठी त्या पार्किंग एरियात घुसताना बटाटा भजीचा सुंगध नाकात पोचायचाच आणि माझा सगळा दृढ निश्चय गळून पडायचा. कधी भजी थंड असेल किंवा संपली असेल तर माझा पडलेला चेहरा बघून त्या ताई माझ्यासाठी खास भजी तळून द्यायच्या. त्यांच्याकडचा वडा-पावही सुंदर असायचा पण मला मोह मात्र भजी-पावचाच. नंतर अस्मादिकांची बदली नवी मुंबईत झाल्याने कारने घर ते ऑफिस आणि परत असा प्रवास सुरु झाला आणि भजीच्या स्टॉलचा संपर्क तुटला. (अर्थात त्यामुळे वजन वाढण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही ही बाब अलहीदा.)
नाही म्हणायला गेल्या वर्षी ऑफिसच्या दौऱ्यावर जात असताना कसाऱ्याला माझ्या एका सहकाऱ्याने मला कांदा भजी चारली होती. स्वाद उत्तम होता पण अंमळ महागच वाटली. भाषेत काय गंमत असते बघा. प्रत्येक प्रांतातल्या भाषेचा गोडवा अवीट असतो. आता हा ‘चारली’ शब्द मला एवढा आवडला की त्याचा उल्लेख इथे करावाच लागला. याच दिवशी मला अजून शब्दाचा अनुभव आला. थोडं विषयांतर होतय पण तुमच्याशी शेअर करायचला नक्की आवडेल. या सहकाऱ्याने अस्मादिकांना त्या दिवशी घरी आग्रहाचे जेवणाचे निमंत्रण दिले. आग्रह काही मोडता येत नव्हता, सहकाऱ्याच्या सौभाग्यवतीने आम्ही घरी पोहचायच्या आत जेवण तयार ठेवले होते. दौरा पुढे कन्टयूनू करायचा असल्याने मला घाई होतीच. त्यांच्या घरी पोहचल्यावर लगेच ताट पुढे आले. आग्रह करुन करुन ताटात जेवण वाढलं जात होत, एवढ्यात एक प्रश्न येऊन थडकला..’साहेब कशी वाटली भाजी?’ अस्मादिक उडालोच, ताटात पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागलो, नाही माझं काहीच चुकत नव्हते पूर्ण नॉन-व्हेज जेवण असताना, भाजी आवडली का? असा प्रश्न का आला हे मला काही समजेना. पण ‘भाजी’ म्हणजेच ‘चिकन’ हे कळल्यावर मात्र मला महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात असलेल्या भाषेची अजून एक गंमत कळाली.
असो, आपण पुन्हा आपल्या भजी-पुराणाकडे वळूया. भज्यांबद्दल लिहीत असताना अस्मादिकांच्या वेंगुर्ल्यातील भज्यांचा उल्लेख झाला नाही तर तो वाचकांवर अन्यायच होईल. तर, रामेश्वर मंदिराच्या शेजारची रेडकरांकडील बटाटा भजी, आबा कुळकरांकडची भजी, बोक्याच्या हॉटेलातील भजी, केळजीच्या हॉटेलातील भजी, फटू कडची भजी, तृप्ती हॉटेलातील भजी … नावं काही संपतत नाहीत. वेंगुर्ल्याहून मुंबईला स्थायिक होण्यापूर्वी आमच्या घरा शेजारी डेऱ्याचे हॉटेल सुरु झाले होते. मी त्यांच्या हॉटेलात त्यावेळी गेलो होतो ते त्यांच्याकडची पातळ भाजी आणि पाव खायला. पुढे या हॉटेलने  वेंगुर्ल्यात बराच जम बसवला. अलीकडे मी इथे एका बिल्डराकडून फ्लॅट खरेदी केला. तेंव्हा त्या कॉम्लेक्सच्या पत्त्यात ‘डेरे हॉटेलच्या बाजूला असा उल्लेख पाहून’ आता त्या हॉटेलचे वेंगुर्ल्यात काय स्थान असेल याची कल्पना आली असेलच.
मुंबईला स्थायिक झाल्यावर आई हयात असताना जेंव्हा जेंव्हा मी वेंगुर्ल्याला जायचो, तेंव्हा आई या हॉटेलातून मला खाऊ म्हणून भज्याची पुडी आणून द्यायची. पुढे यात माझा चिरंजीव वाटेकरी झाला. मायेने आणलेल्या भजीच्या पुडीचा खाऊ खाल्ला नाही असा महाराष्ट्रीयन तुरळच भेटेल. विषेशत: खेडेगावात आणि छोट्या शहरात, बाजारातून येताना नाक्यावरुन पोरांना भजीची पुडी आणली जायची. पूर्वी पानात बांधून मिळणारी भजी आमच्या लहाणपणीच वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळून दिली जावू लागली. तेलकट झालेला तो पेपर आणि त्यावर गुंडाळलेला दोरा, पूडी हातात मिळाल्यावर पोरं त्यावर तुटून पडायचीत. ‘बाहेरचे खायचं नसतं, मी घरात बनवून देईन तुम्हाला भजी’ असे घरातल्या जाणत्या स्त्रीचे शब्द कानावर पडेपर्यंत हातात फक्त तेलकट कागद आणि दोरा शिल्लक उरायचा. पण त्या भजीच्या पुडीत असलेले प्रेम आणि बाहेरची खायची हौस ही त्यावेळच्या पिढीची एक रम्य आठवण.
कांदा-भजीला खेकडा-भजी हे पडलेले नाव तेवढेच गमतीदार वाटते. असो, हे भजी पुराण जेवढं लिहू तेवढं रंगतच जाणार, पण आता आवरतं घ्यावच लागणार. ते बघा हा लेख वाचता वाचता दादा भजीच्या टपरीवर पोहचले सुध्दा. ताईंच्या डाव्या हातात मोबाईल आणि उजवा हात बेसनाच्या डब्यात पोहचलाय. अरे.. भाऊंनी रुमाल काढून मोबाईलची स्क्रीन पुसायला घेतली… राहूंदे भाऊ…. कळतंय आम्हाला, भजी हा विषयच असा आहे.. तोंडाला पाणी आणणारा. आता अजून तुमचा वेळ घेत नाही, अल्पविराम घेतोय. लवकरच भेटू पुढच्या लेखात, धन्यवाद !
संजय गोविंद घोगळे
    (8655178247)
तुम्ही लिहिलेले लेख आमच्या ह्या सदराखाली प्रकाशित करायच्या असतील तर ९३५६९६८४६२ ह्या नंबरवर Whatsapp करा.

Loading

MEMU ट्रेन म्हणजे काय?

मेमू म्हणजे “मुख्य मार्ग विद्युत बहू एकक”. शहरी व उपनगरी भागांना जोडणाऱ्या सामान्य ईएमयू गाड्यांच्या तुलनेत भारतीय रेल्वेवर, एमईएमयू ही विद्युत बहू एकक (ईएमयू) गाड्या आहेत ज्या भारतात लघु आणि मध्यम-अंतरांच्या मार्गावरचालविल्या जातात. ह्या गाड्या ओव्हरहेड तारांमधून २५ किलोव्होल्ट प्रत्यावर्ती धारा वापरून चालविण्यात येतात.

या गाड्या पूर्व घाट व पश्चिम घाट दरम्यान २०० किमी (१२० मैल) पर्यंत गतीवर धावू शकतात. रेकची जास्तीत जास्त अनुमत गती रुंदमापी रुळांवर १०५ किमी/ता (६५ मैल/तास) आहे. मोटरकोच डीसी कर्षण मोटर वापरतात. २०१७ मध्ये, आयसीएफने १६०० एचपी मेधा डेमू वास्तुकलावर आधारित एलएचबी हायब्रीड एसी-एसी मेमू रेक रवाना केले. हे रेक असंकालिक कर्षण मोटर वापरतात आणि त्यांची कमाल संकल्पित गती ११०किमी / ता आहे. हे निष्कलंक स्टीलचे डब्बे असतात. त्यापैकी दोन दक्षिण मध्य रेल्वेवर कार्यरत आहेत .

इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०-१३० किमी / ता वर धावण्यास सक्षम नवीन मेमू सुरू केले. प्रति युनिट निर्माणाची किंमत २६ कोटी रुपये असून ते २,६१८ प्रवासी वाहवून नेऊ शकतात. या ट्रेनमध्ये तीन फेज कर्षण मोटर आहे आणि २५ किलोवोल्ट करंटवर चालते जी ३५% उर्जा वाचवते. यात जीपीएस- आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि कोचमध्ये घोषणा प्रणाली उपलब्ध आहे. यात डबल लीफ स्लाइडिंग दरवाजे, गँगवे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अ‍ॅल्युमिनियम सामान रॅक आहेत.चालकाच्या केबिनमध्ये एसी असून प्रशिक्षकामध्ये आपत्कालीन संप्रेषणाची सुविधा आहे. या गाड्या उत्तर प्रदेशात २००–३०० किमी (१२०–१९० मैल) अंतर असेलेल्या शहरांमध्ये चालण्यासाठी संकल्पित केलेल्या आह. ही सेवा फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू होऊ शकेल.

१९९ ० च्या दशकात भारतीय रेल्वेने १० फूट ८ इंच (३,२५० मिमी) रुंदीचे मेमू यान बांधले. १५ जुलै १९९५ रोजी आसनसोल – आद्रा विभाग आणि २२ जुलै १९९५ रोजी खडगपूर – टाटा विभागात यांची सेवा सुरू झाली. १७ ऑक्टोबर १९९५ रोजी रायपूर – दुर्ग – भाटापारा – रायपूर – बिलासपूर मार्गावर मेमू सेवेचे प्रारंभ झाला. २०१७ मध्ये प्रथम २० डब्ब्यांची मेमू सूरत ते विरार दरम्यान धावले. २०१८ मध्ये, इंटिग्रल कोच फॅक्टरीने ११०–१३० किमी/ता (६८–८१ मैल/तास) गतीवर धावण्यास सक्षम नवीन मेमूची सुरुवात केली

भारतीय रेल्वे हळूहळू सर्व लोहायंत्राने ओढलेल्या मंद आणि वेगवान प्रवासी आणि अंतर शहरी ट्रेनच्या जागी ईएमयू सेवा सुरू करत आहे. श्रेणीसुधारित केलेल्या गाड्यांना पुन्हा मेमू म्हणून चालविल्या केले जाते.

साभार – विकिपीडिया

Loading

पुराच्या पाण्यातून वाहून आलेल्या विषारी सापांपासून कशी सावधगिरी बाळगाल

अतिवृष्टी झाल्याने पावसाळ्यात पूरस्थिती होते. आजूबाजूच्या परिसरात पाणी साचायला सुरू झाले की प्राणी आपल्यासाठी सुरक्षित आसरा शोधायला सुरवात करतात आणि हा आसरा तुमचे घर पण असू शकते. आपल्यासाठी धोकादायक गोष्ट म्हणजे या प्राण्यांमध्ये आजूबाजूचे विषारी साप पण असू शकतात. याशिवाय पुराच्या पाण्यात पण साप वाहून येतात व घरात शिरू शकतात.

ह्या गोष्टीवर खबरदारी म्हणजे ह्या सापांविषयी संपूर्ण माहिती असणे. त्यासाठी आम्ही ह्या पोस्ट सोबत एक pdf स्वरुपात पुस्तिका जोडत आहोत. “उपाय” बहुद्देशीय संस्थेने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. विषारी आणि बिनविषारी साप कसे ओळखायचे, अगदी सारखे दिसणाऱ्या सापाच्या जाती कोणत्या, सर्पदंश झाल्यावर कोणते प्रथमोपचार करावे. सर्पदंश टाळण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगायची याबद्दल माहिती दिली आहे.

 

हि पोस्ट शेयर करा म्हणजे ह्या माहितीने अनेकांचे जीव वाचू शकतील.

 

 

Loading

निसर्ग संर्वधनासाठी करता येऊ शकणाऱ्या २१ सोप्या गोष्टी

आपल्या आजच्या जीवनशैलीने निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. ह्या हानीमुळे होणारे परिणाम दिसू लागले आहेत. आज लोकांची कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ति आणि त्याचे एखाद्या आजाराला बळी पडणे हे चित्र आजकाल दिसत आहे. कोरोना काळात तर परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. ह्या सर्वातून एक शिकवण मिळाली की आरोग्यासाठी निसर्गाला पर्याय नाहीच. आणि लोकाना खरच वाटू लागले की आपण निसर्ग संवर्धनासाठी काही तरी केलेच पाहिजे. 
तुम्हाला निसर्गासाठी काहीतरी करावेसे वाटत असेल तर ईथे तुम्हाला आम्ही लहानशी मदत करू शकतो. 
ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल सर्विसेस, पुणे ही संस्था २००२ पासून निसर्ग संवर्धन – पुनर्जीवन, जीविधीता संवर्धन, निसर्ग शिक्षण, पर्यावरण जागृती क्षेत्रात कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या मानसी करंदीकर आणि केतकी घाटे यांनी कोरोना काळात 21 Prospects For Nature ह्या पुस्तिकेचे मराठीतून तसेच इंग्लिश मधून लिखाण केले आहे. त्यांनी ह्या पुस्तकात निसर्ग संवर्धनासाठी  २१ कृती सांगितल्या आहेत ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात शहरात राहून सुद्धा करू शकतो. 
खालील फोटो वर क्लिक करून तुम्ही हि पुस्तिका डाउनलोड करू शकता.

Loading

असा होता जगातील सर्वात लांब बस मार्ग

भारतातून लंडनला बसने जाता येत होते…!

 

१९५७ ला अल्बर्ट ट्रॅव्हल्सने ही बस सेवा चालू केली होती.त्यांची पहिली बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुटली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती.कलकत्ता ते  लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा मार्ग होता.

 

हा मार्ग बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रीया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन असा जात होता.

 

ह्या बस चा प्रवास एखाद्या सहली सारखा असायचा. मार्गात भेटणारी काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येत होते. त्यात ताजमहाल, बनारस ईत्यादी ठिकाणांचा समावेश असायचा. त्याचप्रमाणे शॉपिंग साठी पण बस काही प्रसिद्ध बाजारपेठेत थांबायची त्यात प्रवासी दिल्ली, तेहरान, काबुल, इस्तंबुल, साल्जबर्ग, विएन्ना येथे शॉपिंग करू शकत होते. साहजिकच ह्या सर्वांसाठी काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते.

 

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ/टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते. फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. झोपण्यासाठी सीट स्लीपर मोड मध्ये करायची सुविधा उपलब्ध होती.

 

तेव्हा बसभाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९रु.)

 

ही बस काही काळासाठी ऑस्ट्रेलिया च्या सिडनी पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सिडनी-कलकत्ता-लंडन असा तो मार्ग होता. हा मार्ग कापण्यासाठी ह्या बसला तब्बल १३०/१३५  दिवस लागायचे.

 

पुढे भारत-पाक यांच्यातील सीमावादामुळे ही बस बंद करावी लागली.

 

 

 

Loading

मालवणी मुलुख – जिल्हा सिंधुदुर्ग

पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.

भौगोलिक स्थिती

सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.

उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.

लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.

कोकणी मेवा

तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.

प्रेक्षणीय स्थळे

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…

 

हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.

साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search