वेंगुर्ला प्रतिनिधी – निर्जिवाला सजिव करणा-या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्वर अशा कलेश्वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनविन हालते देखावे साकारत लोकांनाच आपल्याकडे खेचून आणण्याचे कसब या मेस्त्री वर्गाकडे पहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. त्यातून ब-याच रुढीपरंपरा जपण्याचे काम या उत्सावातून होत आहे. अशीच प्रथा नेरुर गावात ‘मांड‘ या उत्सवातून जपली जात आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड्याची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून ‘गावडे‘ समाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला ‘गोडा रोंबाट‘ असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात, नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर मुख्य ‘मांड उत्सवाला‘ प्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड उत्सव कथांमधील विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. कै. आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे २५ ते ३० फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास २५च्या वर माणसे असतात. असतो. गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्र्फूत असतो.
या ‘मांड‘ उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. साधारण शिवरात्रीच्या दरम्याने श्री कलेश्वराला श्रीफळ ठेऊन देखाव्यांच्या कामाला प्रारंभ केला जातो. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्यासाठी लाखोनी रुपये खर्च येतो. परंतु, याचा विचार न करता आपली कला असंख्य जनसमुदायासमोर आणण्यासाठी सिद्ध होतात. मांड उत्सवाला लाभलेला जनसमुदाय आणि त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारा प्रतिसाद तसेच त्यांच्या कलाकृतीला कॅमेरात टिपणारा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचे बक्षिस म्हणायाला हरकत नाही.
आजपर्यंत पिढ्यान्पिढे हा मेस्त्री समाज ही परंपरा जपत आहे. कालानुरुप त्यात बदलही करत आहेत. त्यांच्या युवा पिढीकडून नेहमी वास्तव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी या उत्सवासाठी मर्यादा होती. त्यामुळे यावर्षी गर्दीने तर उच्चांक गाठला. ‘मांड उत्सव‘ व्यवस्थित पहाता यावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गॅलरीची सोय करण्यात आली होती. तरीही अफाट गर्दीमुळे काहींनी झाडावर तर काहींनी टाचा वर करुन या उत्सवाची मजा लुटली. यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध, विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिग दर्शन व बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मुलाधार अवतार ओंकार दर्शन असे देखावे सादर केले. शिमगोत्सवातील या ‘मांडा‘मुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे.
विशेष आभार
श्री. प्रथमेश गुरव, वेंगुर्ला
लेखक आणि संकलक
संपर्क – ९०२१०७०६२४
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
https://kokanai.in/2022/03/16/shimga/
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा
.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.