पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.
भौगोलिक स्थिती
सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.
उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.
लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.
कोकणी मेवा
तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.
प्रेक्षणीय स्थळे
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…
हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.
साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.