Voice of Konkan : गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे. लवकरच चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू होईल. कोकणात जाणार्या गाड्या फुल भरून जातील आणि कोकणातील सर्व रेल्वे स्थानके गर्दीने फुलून जातील.
कशीबशी ट्रेनची तिकिटे मिळवून (नाही मिळाली तर प्रवासात कसरत करून) चाकरमानी गावी जाण्यास निघतो. गाडीतील गर्दी, रेल्वे मार्गावरील अतिरिक्त गाड्यांमुळे तब्बल 4 ते 5 तास उशीरा धावणाऱ्या गाड्या हे सर्व सहन करून चाकरमानी कोकणातील आपल्या गावच्या जवळच्या स्थानकावर उतरतो. हा त्रास कमी की काय तर त्याला अजून एका त्रासाला सामोरे जावे लागते.
हा त्रास म्हणजे आपल्याच लोकांकडून होणारी त्याची लुबाडणूक. येथील खाजगी वाहतुक व्यावसायिकांकडून खासकरून रिक्षा व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्याची लूट केली जाते. काही ठिकाणी तर हंगामात जवळपास दुप्पट भाडे आकारले जाते. त्यामुळे काही वेळा चाकरमान्यांना मुंबई ते त्या स्थानकापर्यंत जेवढे रेल्वेच्या तिकिटाचे पैसे लागले त्यापेक्षा जास्त भाडे स्थानक ते घर या काही किलोमीटर अंतरासाठी द्यावे लागते.
कोकणात बरीचशी स्थानके शहरापासून दूर असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. गाड्या रात्री अपरात्री पोहोचत असल्याने खाजगी वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय नसतो. या मजबुरीचा फायदा घेऊन दुप्पट भाडे आकारले जाते. या बद्दल विचारले असता ”हेच दिवस आमचे कमवायचे असतात”, ”जायचे असेल तर सांगा नाहीतर सोडा”, ”शहराप्रमाणे आम्हाला रिटर्न भाडे भेटत नाही” अशी उत्तरे भेटतात.
सर्वच रिक्षा व्यायवसायिकांना येथे दोष देणे चुकीचे ठरेल. काही मुजोर रिक्षा व्ययवसायीकांमुळे कोकणातील समस्त रिक्षा व्यायवसायिकांचे नाव खराब होत आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO लक्ष घालणे महत्त्वाचे.
स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO यांनी यात लक्ष घालून ही लूट थांबवणे अपेक्षित आहे. किलोमीटर प्रमाणे भाडे ठरवून दिले पाहिजे. या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे मागत असल्यास त्या व्यावसायिकावर कारवाई केली गेली पाहिजे. हंगामात प्रत्येक रेल्वे स्थानकावर 24 तास RTO कर्मचारी कर्तव्यावर ठेवले गेले पाहिजेत. प्रवासी तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाईन उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तरच या लूटीला आळा घालता येवू शकतो.
![]()



