Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर १५ जूनपासून ‘पावसाळी वेळापत्रक’ लागू; गाड्यांच्या वेळेत मोठे बदल

नवी मुंबई (बेलापूर भवन): कोंकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार कोंकण रेल्वे मार्गावर वर्ष २०२६ चे ‘पावसाळी वेळापत्रक’ (Monsoon Time Table) लागू करण्यात येत आहे. हे नवीन वेळापत्रक १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अंमलात राहणार असून, या काळात अनेक प्रमुख गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (KRCL) वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापकांनी (माल व योजना) २२ मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

सुरक्षेसाठी कालावधीत कपात, गाड्यांचा वेग मर्यादित राहणार

पूर्वी कोंकण रेल्वेवर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केले जात असे. रेल्वे बोर्डाने यंदाही सुरुवातीला याच कालावधीसाठी मंजुरी दिली होती. मात्र, कोंकण रेल्वेने बोगदे आणि धोकादायक डोंगराळ भागांमध्ये (Cuttings/Tunnels) दरडी कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

  • बोल्डर नेटिंग (boulder netting)

  • कॅच वॉटर ड्रेन आणि साईड ड्रेन

  • रिटेनिंग वॉल आणि शॉटक्रिटिंग (shotcreting)

या सर्व उपाययोजनांमुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS – मध्य परिमंडळ, मुंबई) यांनी कागदपत्रांची पडताळणी करून यंदा पावसाळी वेळापत्रकाचा कालावधी कमी करून तो १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ असा मर्यादित ठेवण्याची परवानगी दिली आहे.

पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर गाड्यांच्या वेगावर मर्यादा (Speed Restrictions) आणल्या जाणार असून संवेदनशील भागात गाड्या ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने चालवल्या जातील.

नवे पावसाळी वेळापत्रक

पावसाळ्याच्या काळात गाड्या सुटण्याच्या मूळ वेळेत करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे आहेत:

अनुक्रमांक गाडी क्रमांक गाडीचे नाव / कोठून – कोठे सध्याची वेळ (सुटण्याची) पावसाळी वेळ (सुटण्याची)
22149 एरनाकुलम – पुणे 05.15 02.15
22655 एरनाकुलम – हजरत निजामुद्दीन 05.15 02.15
10107 मडगाव – मंगळुरू सेंट्रल 04.00 04.40
22659 कोचुवेली – योग नगरी ऋषिकेश 09.10 04.50
12217 कोचुवेली – चंदीगड 09.10 04.50
12483 कोचुवेली – अमृतसर 09.10 04.50
19577 तिरुनेलवेली – हापा 08.10 05.10
20923 तिरुनेलवेली – गांधीधाम 08.10 05.10
50104 रत्नागिरी – दिवा पॅसेंजर 05.35 05.50
१० 12202 कोचुवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) 09.10 07.45
११ 22413 मडगाव – हजरत निजामुद्दीन 10.00 08.00
१२ 10104 मडगाव – मुंबई CSMT (मांडवी एक्सप्रेस) 09.15 08.30
१३ 10106 सावंतवाडी रोड – दिवा (तुतारी एक्सप्रेस) 08.25 08.40
१४ 20931 कोचुवेली – इंदूर 11.15 09.10
१५ 20909 कोचुवेली – पोरबंदर 11.15 09.10
१६ 22907 मडगाव – हापा 10.40 10.00
१७ 12449 मडगाव – चंदीगड (गोवा संपर्क क्रांती) 11.20 10.00
१८ 12617 एरनाकुलम – हजरत निजामुद्दीन (मंगला लक्षद्वीप) 13.25 10.30
१९ 11100 मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) 12.30 11.30
२० 12052 मडगाव – मुंबई CSMT (जनशताब्दी एक्सप्रेस) 15.05 12.00
२१ 22230 मडगाव – मुंबई CSMT (वंदे भारत एक्सप्रेस) 14:40 12:20
२२ 12620 मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा) 14.20 12.45
२३ 22120 मडगाव – मुंबई CSMT (तेजस एक्सप्रेस) 15.35 12.50
२४ 22116 करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस (AC एक्सप्रेस) 14.10 13:40
२५ 10216 एरनाकुलम – मडगाव 10.40 13.25
२६ 22476 कोईम्बतूर – हिसार 14.55 13.30
२७ 12431 तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन (राजधानी) 19.15 14.40
२८ 56615 मडगाव – मंगळुरू सेंट्रल 14:10 14:15
२९ 12134 मंगळुरू जंक्शन – मुंबई CSMT (सुपरफास्ट) 14.00 16.35
३० 20645 मडगाव – मंगळुरू सेंट्रल 18:10 17:35
३१ 11004 सावंतवाडी रोड – दादर (तुतारी एक्सप्रेस) 20.00 17.55
३२ 20112 मडगाव – मुंबई CSMT (कोंकण कन्या एक्सप्रेस) 19.00 18.00
३३ 50107 सावंतवाडी रोड – मडगाव 18.35 18.50
३४ 12977 एरनाकुलम – अजमेर (मरुसागर एक्सप्रेस) 20.25 18.50
३५ 11204 मडगाव – नागपूर 20.00 19.00
३६ 10215 मडगाव – एरनाकुलम 19.30 21.00
३७ 22653 तिरुवनंतपुरम – हजरत निजामुद्दीन 00.50 (शनिवार) 22.00 (शुक्रवार)

पावसाळ्याच्या ४ महिन्यांत काही गाड्यांच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत:

  • मुंबई CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230): सध्या ही गाडी आठवड्यातून ६ दिवस धावते, परंतु पावसाळ्यात ती त्रैसाप्ताहिक (आठवड्यातून ३ दिवस) धावेल. CSMT वरून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि मडगाववरून मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी ही गाडी धावेल.

  • मुंबई CSMT – मडगाव तेजस एक्सप्रेस (22119/22120): ही गाडी देखील पावसाळ्यात त्रैसाप्ताहिक करण्यात आली आहे.

  • एलटीटी – मडगाव एक्सप्रेस (11099/11100): ही गाडी पावसाळ्यात द्विसाप्ताहिक (आठवड्यातून २ दिवस) धावेल. एलटीटीवरून शुक्रवार व रविवार, तर मडगाववरून शनिवार व सोमवार अशी ही गाडी सुटेल.

रेल्वे प्रशासनाचे कडक सुरक्षेचे आदेश

रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी कोंकण रेल्वेला कडक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत: १. सर्व पेट्रोलमन आणि वॉचमन यांना GPS ट्रॅकर्स पुरवणे अनिवार्य आहे. २. धोकादायक ठिकाणी २४ तास तैनात असणारे स्टेशनरी वॉचमन ठेवले जातील. ३. रेल्वे रुळांच्या बाजूला असणाऱ्या झाडांची छाटणी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. ४. वेळेच्या गणितापेक्षा (Punctuality) प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची मानून गरजेनुसार आपत्कालीन गती निर्बंध (Emergency Speed Restrictions) लावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

प्रवाशांना आवाहन: पावसाळी वेळापत्रकामुळे गाड्यांच्या वेळेत तसेच धावण्याच्या दिवसांत बदल होणार असल्याने, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी कोंकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.konkanrailway.com) किंवा जवळच्या रेल्वे स्थानकावर चौकशी करूनच प्रवास करावा, असे आवाहन कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे करण्यात आले आहे.

Sawantwadi: ‘एका’ चे नाही तर ‘एकी’ चे यश! सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या निर्णयानंतर शहरात पेढे वाटून जल्लोष

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या टर्मिनसचे नाव आता “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” असे होणार असून, राज्य सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोकणातील जनतेची आणि रेल्वे प्रवासी संघटनेची ही अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागल्याने सावंतवाडीत प्रचंड आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाचे वृत्त समजताच सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शहरात व रेल्वे स्थानकावर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला, तर सावंतवाडी येथील ऐतिहासिक गांधी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.

​हा ऐतिहासिक निर्णय मिळवून देण्यासाठी ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’च्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने रस्त्यावरील आंदोलनापासून ते मंत्रालयापर्यंत मोठा संघर्ष केला गेला. संघटनेने जानेवारी २०२४ मध्ये स्थानक नामकरण व टर्मिनसच्या रखडलेल्या कामासाठी २६ जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत सावंतवाडीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला तातडीने पत्र पाठवले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट २०२४ रोजी रेल्वे प्रशासनाने हा विषय राज्य शासनाचा असल्याचे स्पष्ट केल्यावर संघटनेने आपला मोर्चा राज्य सरकारकडे वळवला. आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे ४ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रालयात या विषयावर उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये संघटनेच्या वतीने सागर तळवडेकर, मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी प्रवाशांची बाजू भक्कमपणे मांडली.

​या संपूर्ण लढ्यात लोकप्रतिनिधींचा आणि विविध शासकीय स्तरावरील बैठकांचा मोठा वाटा राहिला. मागील आठवड्यात १८ मे रोजी संघटनेच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष विनोद नाईक यांनी मंत्रालयात जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली होती, ज्यावर त्यांनी अवघ्या चार दिवसांत सकारात्मक निर्णय मिळवून दिला. तसेच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. याशिवाय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. हा लढा केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित न ठेवता संघटनेने एक्स (Twitter), फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर ‘ई-मेल आणि तक्रार मोहीम’ राबवून डिजिटल जनआंदोलन उभे केले, ज्यामुळे सरकारला याची दखल घेणे भाग पडले.

​हे यश कोणा एकाचे नसून सर्वांच्या एकीचे फळ असल्याचे सांगत संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी ‘कोकण विकास समिती’चे जयवंत दरेकर, अक्षय महापदी तसेच ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ’ व ‘जनजागृती सेवा संस्था’ यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय खासदार, आमदार आणि पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. प्रा. मधु दंडवते साहेबांचे नाव स्थानकाला मिळाल्याने सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, आगामी काळात सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ण करणे, नवीन कामे समाविष्ट करणे आणि कोरोना काळात बंद झालेले थांबे व गाड्या पूर्ववत करण्यासाठी संघटना आपला लढा अविरत सुरू ठेवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय: ५ विशेष गाड्या आता धावणार नियमित; प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्तम निर्णय घेतला आहे. रेल्वे विभाग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जवळपास सर्वच लांब पल्ल्याच्या विशेष (Special) गाड्या आता नियमित (Regular) करणार आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांना होणारे फायदे:

  • प्रवाशांना विशेष भाड्याऐवजी आता नियमित रेल्वे भाडेतक्त्यानुसारच तिकीट दर द्यावे लागतील, ज्यामुळे अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडणार नाही.

  • गाड्या नियमित झाल्यामुळे यामध्ये ‘तत्काळ कोटा’ (Tatkal Quota) यासह इतर सर्व आरक्षित कोटे लागू होतील.

नियमित होणाऱ्या ५ जोड्या गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. ट्रेन क्र. १९४१९/२० अहमदाबाद – तिरुचिरापल्ली – अहमदाबाद साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०९४१९/२० चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १९४१९ एक्सप्रेस: प्रत्येक गुरुवारी सकाळी ०९:३० वाजता अहमदाबादहून सुटेल आणि शनिवारी पहाटे ०३:३५ वाजता तिरुचिरापल्ली येथे पोहोचेल.

    • १९४२० एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक रविवारी सकाळी ०५:४५ वाजता तिरुचिरापल्लीहून सुटेल आणि सोमवारी रात्री २१:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे (Stoppages): अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण, पुणे, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदानी, गुंटकल, तादिपत्री, कडापा, रेनिगुंटा, अरकोणम, पेरंबूर, चेन्नई एगमोर, तांबरम, चेंगलपट्टू, विल्लुपुरम, कड्डलोर, चिदंबरम, सिरकाझी, वैतीस्वरणकोईली, मैलादुथुराई, कुंभकोणम, पापनासम, तंजावर, तिरुचिरापल्ली.

  • कोच रचना (Coach Composition): ०१ वातानुकूलित टू-टियर (2AC), ०३ वातानुकूलित थ्री-टियर (3AC), १२ स्लीपर (Sleeper), ०४ द्वितीय श्रेणी साधारण (General) आणि ०२ एसएलआर (SLR) – एकूण २२ ICF कोच.

२. ट्रेन क्र. १९५२५/२६ हापा – नाहारलगुन – हापा साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०९५२५/२६ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १९५२५ एक्सप्रेस: प्रत्येक बुधवारी मध्यरात्रीनंतर (अल-सुबह) ००:४० वाजता हापाहून सुटेल आणि शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता नाहारलगुन येथे पोहोचेल.

    • १९५२६ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक शनिवारी सकाळी ०९:४० वाजता नाहारलगुनहून सुटेल आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर ००:३० वाजता हापा येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, छायापुरी, गोधरा, रतलाम, नागदा, उज्जैन, मक्सी, शाजापूर, ब्यावरा राजगड, रुठियाई, गुणा, शिवपुरी, ग्वाल्हेर, भिंड, इटावा, गोविंदपुरी, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपूर रोड, बनारस, वाराणसी जंक्शन, गाझीपूर सिटी, बलिया, छप्रा, हाजीपूर, शाहपूर पटोरी, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाछिया, कटिहार, बारसोई, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, बारपेटा रोड, रंगिया, उदलगुरी, न्यू मिसामारी, रँगापारा नॉर्थ, हरमुती, नाहारलगुन.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित टू-टियर, ०३ वातानुकूलित थ्री-टियर, १२ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २२ ICF कोच.

३. ट्रेन क्र. ११६६५/६६ राणी कमलापती – अगरतळा – राणी कमलापती साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०१६६५/६६ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • ११६६५ एक्सप्रेस: प्रत्येक गुरुवारी दुपारी १५:२० वाजता राणी कमलापतीहून सुटेल आणि शनिवारी संध्याकाळी १८:५५ वाजता अगरतळा येथे पोहोचेल.

    • ११६६६ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक रविवारी संध्याकाळी १७:२० वाजता अगरतळाहून सुटेल आणि मंगळवारी संध्याकाळी १६:३५ वाजता राणी कमलापती येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, पिपरिया, गाडरवाडा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सातना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगरिया, नौगाछिया, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगाव, रंगिया, गुवाहाटी, चापरमुख, न्यू हाफलाँग, बदरपूर, न्यू करीमगंज, धर्मनगर, कुमारघाट, आंबासा, तेलियामुरा, अगरतळा.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित टू-टियर, ०५ वातानुकूलित थ्री-टियर, ११ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २३ ICF कोच.

४. ट्रेन क्र. २०१६०/५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस

(गाडी क्र. ०२१९८/९७ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • २०१६० सुपरफास्ट: प्रत्येक शुक्रवारी रात्री २३:५० वाजता जबलपूरहून सुटेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूर येथे पोहोचेल.

    • २०१५९ सुपरफास्ट (परतीचा प्रवास): प्रत्येक सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता कोईम्बतूरहून सुटेल आणि बुधवारी सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: जबलपूर, नरसिंगपूर, गाडरवाडा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमठा, बिंदूर मूकंबिका रोड, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू, कासारगोड, कण्णूर, वडाकरा, कोझिकोड मेन, तिरूर, शोराणूर, पालक्काड, कोईम्बतूर.

  • कोच रचना: ०१ वातानुकूलित प्रथम श्रेणी (1AC), ०२ वातानुकूलित टू-टियर, ०६ वातानुकूलित थ्री-टियर, ०९ स्लीपर, ०४ द्वितीय श्रेणी साधारण आणि ०२ एसएलआर – एकूण २४ ICF कोच.

५. ट्रेन क्र. १५३०२/०१ लालकुवा – क्रांतीवीर सांगोली रायाण्णा बेंगळुरू सेंट्रल – लालकुवा साप्ताहिक एक्सप्रेस

(गाडी क्र. ०५MD७३/७४ चे नियमितीकरण)

  • वेळापत्रक:

    • १५३०२ एक्सप्रेस: प्रत्येक शनिवारी संध्याकाळी १७:४५ वाजता लालकुवा येथून सुटेल आणि सोमवारी दुपारी १५:२५ वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल.

    • १५३०१ एक्सप्रेस (परतीचा प्रवास): प्रत्येक मंगळवारी सकाळी ०७:१५ वाजता बेंगळुरूहून सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०९:०५ वाजता लालकुवा येथे पोहोचेल.

  • प्रमुख थांबे: लालकुवा, किच्छा, बहेडी, भोजीपुरा, इज्जतनगर, बरेली सिटी, बरेली जंक्शन, बदायूं, कासगंज, हाथरस सिटी, मथुरा कॅंट, मथुरा जंक्शन, आग्रा कॅंट, ग्वाल्हेर, राणी लक्ष्मीबाई झाशी, राणी कमलापती, इटारसी, बैतुल, नागपूर, सेवाग्राम, चंद्रपूर, बलहारशाह, सिरपूर कागजनगर, मंचरियाल, पेदापल्ली, वरंगल, महबुबाबाद, खम्मम, विजयवाडा, तेनाली, ओंगोल, नेल्लोर, गुडूर, रेनिगुंटा, काटपाडी, जोलारपेट्टई, कुप्पम, बांगरपेट, कृष्णराजपुरम, बेंगळुरू कॅंट, केएसआर बेंगळुरू सेंट्रल.

रेल्वे मुख्यालयाने संबंधित विभागीय रेल्वे प्रशासनाला वरील सर्व गाड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नामकरण; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

   Follow us on        
मुंबई: कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून, याबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे कोकणातील जनतेची आणि विविध प्रवासी संघटनांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे. यासाठी  कोकण विकास समिती, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ आदी संघटनांनी प्रयत्न केले होते.
स्व. मधु दंडवते साहेबांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे, यासाठी कोकण विकास समितीने विशेष प्रयत्न केले होते. समिती मार्च २०२१ पासून सातत्याने पाठपुरावा करत होती. सुरुवातीला कोकण रेल्वे प्रशासनाने हे प्रकरण राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट केल्यावर, समितीने जून २०२३ मध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला. त्यानंतर हा प्रस्ताव परिवहन विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सावंतवाडी पंचायत समिती आणि मळगाव ग्रामपंचायत अशा प्रशासकीय स्तरातून सकारात्मक अहवालांसह पुढे सरकला. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेर आज, २६ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी या नामकरणाच्या प्रस्तावावर मंजुरीची मोहोर उमटवली. कोकणाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेसाठी स्व. मधु दंडवते यांनी दिलेले अमूल्य योगदान अतुलनीय आहे. अखंड कोकणवासीयांच्या मनातील भावनांचा आदर करत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय आणि कोकण विकास समितीचा यशस्वी पाठपुरावा, ही संपूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणारी विशेष गाडी आता नियमित धावणार; थांबे आणि वेळापत्रक ईथे पहा

   Follow us on        

​Konkan Railway: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोईम्बतूर आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष ट्रेन (०२१९८/०२१९७) आता अधिकृतपणे नियमित (Regularize) करण्यात आली आहे. या ट्रेनला आता २०१६०/२०१५९ जबलपूर – कोईम्बतूर – जबलपूर एक्सप्रेस म्हणून चालवले जाईल. या निर्णयामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे नवीन क्रमांक आणि वेळापत्रक:

​१. गाडी क्रमांक २०१६० (जबलपूर ते कोईम्बतूर एक्सप्रेस):

​दिवस: दर शुक्रवारी रात्री २३:५० वाजता ही ट्रेन जबलपूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: शनिवारी सकाळी ०६:४२ वाजता खंडवा, दुपारी १६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि रविवारी दुपारी १४:३० वाजता कोईम्बतूरला पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक २०१५९ (कोईम्बतूर ते जबलपूर एक्सप्रेस):

​दिवस: दर सोमवारी संध्याकाळी १७:०५ वाजता ही ट्रेन कोईम्बतूरवरून सुटणार.

​महत्त्वाच्या वेळा: बुधवारी पहाटे ०२:३२ वाजता खंडवा आणि सकाळी ०८:४५ वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

​महाराष्ट्रातील प्रमुख थांबे (Commercial Stoppages):

​कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या या ट्रेनला महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

​भुसावळ

​नाशिक रोड

​पनवेल

​रोहा

​खेड

​चिपळूण

​रत्नागिरी

​कणकवली

​कुडाळ

​इतर राज्यातील प्रमुख थांबे: नर्सिंगपूर, गाडरवारा, पिपारीया, इटारसी, हरदा, खंडवा, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, पालक्काड इत्यादी.

​गाड्यांची रचना (Coach Composition):

​या एक्सप्रेसला एकूण २४ डबे (Coaches) असणार आहेत, ज्यामध्ये प्रवाशांच्या सर्व श्रेणींचा विचार करण्यात आला आहे:

​स्लीपर क्लास (WGSCN): ९ कोच

​थर्ड एसी (WGACCN): ६ कोच

​सेकंड एसी (WGACCW): २ कोच

​फर्स्ट एसी (WGFAC): १ कोच

​सामान्य डबे (GS): ४ कोच

​इतर (GSLR/GSLRD): २ कोच

​कधीपासून होणार सुरू?

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून लवकरच एका सोयीस्कर तारखेपासून ही ट्रेन नियमित सेवा म्हणून रुळावर धावणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास सुरुवातीला ही गाडी विशेष उद्घाटनात्मक सेवा म्हणूनही चालवली जाऊ शकते. प्रवाशांनी तिकीट बुकिंग आणि अधिकृत तारखेसाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी रस्ता नसल्याने रुळांवरून चालताना एक्सप्रेसची धडक; नाधवडे येथील तरुणाचा जागीच मृत्यू

   Follow us on        

वैभववाडी:रेल्वेची जोरदार धडक बसल्याने नाधवडे-हेलकरवाडी येथील अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६) या युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही भीषण घटना सकाळी साडेआठच्या सुमारास शुकनदी पुलाजवळ घडली. अमोल खांडेकर हे मुंबईतील चिंचपाडा परिसरात आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह राहत होते आणि एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. ते आपल्या मालकीच्या जमिनीत काजू लागवडीची पूर्वतयारी करण्यासाठी गावी आले होते.

रविवारी सकाळी ते कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरले आणि तिथून पायीच घराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शुकनदी पुलाजवळ पोहोचताच गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या निस्सार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संबंधित एक्सप्रेस सुमारे तासभर घटनास्थळी थांबवण्यात आली होती, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच अपघात; ग्रामस्थांचा आरोप

​या भीषण अपघातानंतर हेलकरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या वाडीत जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. रस्त्याअभावी येथील लोकांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून किंवा पुलावरूनच ये-जा करावी लागते आणि याच मुख्य कारणामुळे हा भीषण अपघात घडला आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे हक्काच्या पर्यायी रस्त्यासाठी वारंवार तक्रारी व मागण्या करण्यात आल्या आहेत, मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या याच उदासीनतेमुळे आज एका निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

​पोलिसांकडून तपास सुरू

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दलाचे अधिकारी प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलिसांना तात्काळ कल्पना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज सोनलवलकर, पोलीस हवालदार धनाजी धडे व उद्धव साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अपघाताची माहिती मिळताच अमोल खांडेकर यांचे मुंबईतील नातेवाईक गावी रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक जाण्याने हेलकरवाडी परिसरात आणि खांडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातून पर्यायी रस्त्याची मागणी आता अधिक आक्रमकपणे केली जात आहे.

Konkankanya Express: ‘सुपरफास्ट’ शुल्काच्या नावाखाली प्रवाशांची लूट!

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अत्यंत लाडकी आणि महत्त्वाची समजली जाणारी ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (गाडी क्र. २०१११ / २०११२) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमालीची उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘सुपरफास्ट एक्सप्रेस’चा दर्जा असलेल्या या गाडीकडून प्रवाशांकडून तिकिटासोबत जादा सुपरफास्ट शुल्क वसूल केले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी दररोज २ ते २.५ तास उशिराने धावत असल्याने, “रेल्वे प्रशासन सुपरफास्टच्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक लूट करत आहे का?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावणारी ही गाडी प्रत्येक स्थानकावर वेळेचे उल्लंघन करत आहे. मुंबईकडे येणारी गाडी असो वा गोव्याकडे जाणारी, प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मडगावकडे जाणारी २०१११ कोकणकन्या एक्सप्रेस खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी येथे तब्बल २ ते २.५ तास उशिराने पोहोचली. रत्नागिरीत सकाळी ५:०० वाजता येणारी गाडी थेट ७:५४ वाजता पोहोचल्याने प्रवाशांचे हाल झाले. एवढेच नव्हे तर २१, २२ आणि २३ मे रोजी मडगावला पोहोचताना देखील या गाडीला २ तासांपेक्षा जास्त उशीर झाला होता.

​दुसरीकडे, मडगावहून मुंबईकडे येणाऱ्या २०११२ कोकणकन्या एक्सप्रेसची स्थितीही वेगळी नाही. २२ मे च्या प्रवासात ही गाडी पनवेल, ठाणे आणि दादर येथे तब्बल २ तास ४० मिनिटे उशिराने धावत होती. तर २३ मे रोजी सुटलेली गाडीही १ तास १० मिनिटे उशिराने धावत मुंबईला पोहोचली. कोकण रेल्वेच्या या सावळागोंधळामुळे प्रवाशांचे कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या गाडीला सुपरफास्ट वर्गात समाविष्ट करण्यात आले असले तरी ही गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याने प्रवाशी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सुपरफास्ट’चे पैसे घ्यायचे आणि सेवा मात्र ‘पॅसेंजर’पेक्षाही संथ द्यायची, या रेल्वेच्या कारभारावर आता प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतला असून, कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तात्काळ सुधारीत पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रवाशांनो लक्ष द्या! CSMT येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी रेल्वेचा १० दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंत मर्यादित

   Follow us on        

मुंबई:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने, अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या आगामी १० दिवसांसाठी दादर आणि ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर पायाभूत तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानुसार, २९ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या कालावधीसाठी काही अप मेल/एक्सप्रेस गाड्या शॉर्ट टर्म (दादर/ठाणे पर्यंतच) चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आला आहे, ज्याची यादी खालीलप्रमाणे आहे:

​दादर पर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या:

गाडी क्र. १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११००२ बल्लारशाह – सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, गाडी क्र. १२८१० हावडा – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. ११०२० भुवनेश्वर – सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, गाडी क्र. २२१४४ बिदर – सीएसएमटी एक्सप्रेस, गाडी क्र. २२१०८ लातूर – सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्र. २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्सप्रेस या सर्व गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर येथे थांबवण्यात येतील.

ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित केलेल्या गाड्या 

गाडी क्र. १२१३४ मंगळूर – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीपर्यंत न जाता ठाणे स्थानकातच थांबवण्यात येईल.

​या रेल्वे ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने प्रवाशांना आधीच सूचित केले असून, सर्वांनी आपल्या प्रवासाचे नियोजन या बदललेल्या वेळापत्रकानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी जादा डबा (कोच) जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार गाडी संख्या १०११६/१०११५ मडगाव जंक्शन – वांद्रे (टर्मिनस) – मडगाव जंक्शन द्विसप्ताहिक एक्सप्रेस आणि गाडी संख्या १०२१५/१०२१६ मडगाव जंक्शन – एर्नाकुलम जंक्शन – मडगाव जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेसमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात येणार आहे. यामुळे या गाड्यांची एकूण डब्यांची संख्या आता २० वरून २१ (LHB कोचेस) होणार असून, प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

​या सुधारित रचनेनुसार, मडगाव येथून सुटणाऱ्या वांद्रे एक्सप्रेसला (१०११६) २६ मे २०२६ पासून, तर वांद्रे येथून सुटणाऱ्या मडगाव एक्सप्रेसला (१०११५) २७ मे २०२६ पासून हा जादा डबा जोडला जाईल. तसेच, मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या (१०२१५) प्रवासासाठी २४ मे २०२६ पासून आणि एर्नाकुलम-मडगाव एक्सप्रेससाठी (१०२१६) २५ मे २०२६ पासून ही नवीन डब्यांची रचना लागू होईल. नवीन रचनेमध्ये १ डबा २ टायर एसी, ४ डबे ३ टायर एसी, २ डबे ३ टायर इकॉनॉमी, ८ स्लीपर क्लास, ४ जनरल डबे, १ जनरेटर कार आणि १ SLR कोचचा समावेश असेल.

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. गाड्यांच्या थांब्यांच्या व वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीच्या ४ फेऱ्या; परतीच्या प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

रत्नागिरी:उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मडगाव ते पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी संख्या ०११०६/०११०५ मडगाव-पनवेल-मडगाव साप्ताहिक विशेष (TOD) या गाडीच्या दोन्ही दिशांनी मिळून एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​या वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०११०६ मडगाव-पनवेल विशेष ट्रेन मडगाव येथून रविवार, दिनांक २४ मे २०२६ आणि ३१ मे २०२६ रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०४:०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी संख्या ०११०५ पनवेल-मडगाव विशेष ट्रेन सोमवार, दिनांक २५ मे २०२६ आणि ०१ जून २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​ही ट्रेन २३ आयसीएफ (ICF) कोचच्या संरचनेसह धावणार असून, यामध्ये ११ स्लीपर क्लास, ३ थर्ड एसी (3A), ७ जनरल आणि २ एसएलआर (SLR) डब्यांचा समावेश असेल. मध्य रेल्वे (CR) क्षेत्रात या गाडीला रोहा, पेण आणि पनवेल या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि माणगाव या स्थानकांवरही ही ट्रेन थांबणार आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search