Category Archives: गोवा वार्ता

सिंधुदुर्गातील पर्यटकांना गोव्यात मारहाण; महाराष्ट्र-गोवा सीमेवर युवासेनेचे तीव्र आंदोलन

   Follow us on        

बांदा: गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील महिला, लहान मुले आणि तरुणांना स्थानिक मद्यपींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २५ मे रोजी युवासेनेने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे तीव्र आंदोलन छेडले. युवासेना पदाधिकारी सुरज परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही राज्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे.

​मारहाणीच्या या गंभीर घटनेनंतर गोवा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडूनही कोणतीही दाद मिळाली नाही. प्रशासनाच्या आणि गोवा पोलिसांच्या याच उदासीनतेमुळे आंदोलकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, असा आरोप सुरज परब यांनी केला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गोव्याच्या बाजूने पेडणेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बाजूने बांद्यापर्यंत वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. “गोव्याची गाडी पुढे जाऊ देणार नाही” या भूमिकेवर आंदोलक ठाम असल्याने आता या प्रकरणात गृहखात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Photo Credit – AI

गोवा-कोकणात पर्यटनाचा बेत आखत असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गोवा:मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गोवा आणि कोकणात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करत कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता थेट पर्यटन क्षेत्राला या इंधन टंचाईची झळ बसू लागली आहे.

​इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालक हवालदिल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावरील काही पंपांवर वाहनांना केवळ हजार ते पंधराशे रुपयांचेच मर्यादित पेट्रोल-डिझेल दिले जात आहे. दुसरीकडे, सीएनजी (CNG) गॅस भरण्यासाठी वाहनधारकांना तब्बल ३ ते ४ तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सुट्ट्या गावी घालवण्यासाठी आलेले चाकरमानी आणि पर्यटकांचा अमूल्य वेळ रांगेतच वाया जात आहे.

​इंधनाच्या या तीव्र टंचाईमुळे पर्यटकांच्या फिरण्यावर मोठ्या मर्यादा आल्या असून, येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची आणि पेट्रोल पंप पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोकण किंवा गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल, तर प्रवासाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

गोवा-महाराष्ट्र सीमेवर आता अत्याधुनिक ‘गोवा प्रणाली’ द्वारे वाहन तपासणी

   Follow us on        

बांदा: गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी चेकपोस्टवर ‘गोवा’ (Government Automated Vehicle Documentation Check) या अत्याधुनिक वाहन तपासणी प्रणालीची सध्या प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप अधिकृतपणे बाकी असली, तरी वाहनधारक आणि पर्यटकांमध्ये याबाबत सध्या मोठी चर्चा रंगली आहे. सीमेवर होणारी वाहनांची गर्दी आणि तपासणीसाठी लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या नवीन तंत्रज्ञानांतर्गत चेकपोस्टवर उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत, जे वाहनांची नंबर प्लेट (ANPR) स्वयंचलितपणे स्कॅन करतात. अवघ्या काही सेकंदांतच संबंधित वाहनाचा नोंदणी तपशील, विम्याची वैधता, प्रदूषण प्रमाणपत्र (PUC) आणि फिटनेस सर्टिफिकेट यांसारखी महत्त्वाची माहिती सिस्टिममध्ये उपलब्ध होते. यामुळे वाहनधारकांना आता कागदपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात दाखवण्याची गरज उरणार नसून तपासणी प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान होणार आहे.

सध्या ही प्रणाली चाचणीच्या टप्प्यात असून प्रशासन कॅमेऱ्यांची अचूकता आणि डेटाबेसच्या संकलनावर लक्ष केंद्रित करत आहे. एकदा ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाही तर, वाहनाच्या कागदपत्रांमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्यास, संबंधित वाहनधारकांना गोव्यात प्रवेश नाकारण्याचा कठोर निर्णयही प्रशासनाकडून घेतला जाऊ शकतो.

भविष्यातील कडक अंमलबजावणी पाहता, सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वेळेत अद्ययावत ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीमेलगत ही प्रणाली कार्यान्वित झाल्यापासून, ज्या वाहनांकडे वैध प्रदूषण प्रमाणपत्र नाही अशा काही चालकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून पारदर्शकता वाढवण्यासाठी या आधुनिक सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.

सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ पडली महागात! विर्डीच्या जंगलात अडकलेल्या ५ विद्यार्थ्यांची थरारक सुटका.

   Follow us on        

दोडामार्ग (प्रतिनिधी): सोशल मीडियावरील माहिती पाहून विर्डी परिसरातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गोव्यातील पाच पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात जाणे चांगलेच महागात पडले. मात्र, दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे या पाचही विद्यार्थ्यांची मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय? गोव्यातील पणजी-आक्षी येथील चार मुले आणि एक मुलगी असे पाच जण विर्डी गावातील वझरेरेखल धबधबा पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत धबधब्याचा आनंद लुटल्यानंतर, परतीचा मार्ग शोधताना हे विद्यार्थी रस्ता चुकले. मोबाईलचे कमकुवत नेटवर्क, सभोवताली घनदाट जंगल आणि हिंस्र वन्यप्राण्यांचे आवाज यामुळे हे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते.

पोलिसांची धाडसी मोहीम: घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी ७:१५ वाजता ‘११२’ क्रमांकावर कॉल करून मदतीची विनंती केली. नागपूर नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच सिंधुदुर्ग पोलिसांनी दोडामार्ग पोलिसांना तातडीने सूचना दिल्या. दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक मानसी गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.

जंगलात वाहन जाण्यास मार्ग नसल्याने पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन पायी शोधमोहीम सुरू केली. हा परिसर अस्वल, वाघ आणि कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर असलेला भाग असल्याने ही मोहीम अत्यंत जोखमीची होती.

चार तासांनंतर लागला शोध: सुमारे चार तास उपाशीपोटी आणि भीतीपोटी नदीकाठी थरथरत बसलेल्या या विद्यार्थ्यांना अखेर रात्री १०:४५ च्या सुमारास शोध पथकाने शोधून काढले. पोलिसांचा आवाज ऐकताच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आम्ही प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परतलो,” अशी भावना सुटका झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक या पर्यटकांना जंगलाबाहेर काढून त्यांच्या दुचाकींपर्यंत सुरक्षित पोहोचवले.

प्रशासनाचे आवाहन: विर्डीचे जंगल निसर्गाने समृद्ध असले तरी तेवढेच धोकादायक आहे. त्यामुळे पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाताना खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे आणि ग्रामस्थांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Konkan Railway: कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला; रेल्वेकडून रोख पुरस्कार जाहीर

   Follow us on        

मडगाव: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी मडगाव यार्डमध्ये रेल्वे ट्रॅकवरील वेल्ड फेल्युअर (वेल्डिंग बिघाड) ओळखल्याबद्दल पॉइंट्समन श्री. सुदेश साळुंके यांना रोख १०,००० रुपयांचा स्पॉट कॅश पुरस्कार जाहीर केला.

त्यांच्या सतर्क निरीक्षणामुळे संभाव्य मोठा अपघात टाळला गेला आणि ट्रेनांच्या सुरक्षित संचालनाला मदत झाली. कोकण रेल्वे मार्गाच्या कठीण डोंगराळ आणि जंगलयुक्त भौगोलिक रचनेत ट्रॅकची अखंडता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा छोट्या बिघाडामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने पॉइंट्समन साळुंके यांच्या या त्वरित कृतीला विशेष महत्त्व आहे.

सादरसेवा उपक्रमांतर्गत कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा आणि सजगतेची संस्कृती बळकट करण्यासाठी असे पुरस्कार नियमितपणे दिले जातात. नियंत्रण कक्षात पुरस्कार वितरण करताना श्री. झा यांनी कर्मचाऱ्यांच्या या योगदानाचे कौतुक केले.

कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधून जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज अनेक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या येथून धावतात. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला बळ मिळते. कोकण रेल्वे प्रशासनाने यापुढेही अशा सकारात्मक कृतींना प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

 

 

‘ओंकार’ला महाराष्ट्रातच रोखण्यासाठी गोवा वनविभागाची अनोखी युक्ती

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमाभागात सध्या वन्य हत्तींचा वावर चिंतेचा विषय ठरत असतानाच, गोवा वनविभागाच्या एका धक्कादायक मोहिमेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘ओंकार’ नावाचा वन्य हत्ती गोव्याच्या हद्दीत येऊ नये, यासाठी गोव्याचे वन कर्मचारी चक्क महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन त्याला गुळ, केळी आणि विविध फळे खाऊ घालत असल्याचे समोर आले आहे.

गोव्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी ही विशेष मोहीम हाती घेतली असली, तरी यामुळे महाराष्ट्रातील शेती आणि बागायती धोक्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना महाराष्ट्र आणि सावंतवाडी वनविभागाचे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वन्य हत्तीला अशा प्रकारे खाद्य देऊन एकाच भागात रोखून धरले जात असताना स्थानिक वनाधिकाऱ्यांनी याला ‘मूक संमती’ दिल्याचे चित्र दिसत आहे. डोळे उघडे असूनही गांधारीची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र वनविभागाच्या या उदासीनतेमुळे सीमाभागातील नागरिक संतप्त झाले असून, हत्तीच्या या कायमस्वरूपी वास्तव्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

Photo Credit – AI

रेल्वे ट्रॅफिक ब्लॉक: उन्हाळी सुट्टीत रेल्वेने गोव्याला जायचा बेत असेल तर ही बातमी वाचाच!

   Follow us on        

हुबळी: दक्षिण पश्चिम रेल्वेच्या घाट विभागात असलेल्या कॅसलरॉक आणि कुलेम स्थानकांदरम्यान ‘बीसीएम’ (BCM) कामासाठी दररोज ५ तासांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २८ एप्रिल २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत सकाळी ११:०० ते दुपारी १६:०० वाजेपर्यंत असेल.

उन्हाळी सुट्ट्यांच्या पर्यटनाला फटका

हा ब्लॉक नेमका उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या हंगामात घेण्यात येत असल्याने, उन्हाळ्यात गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आणि नियमित प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक गाड्या वास्को-द-गामा (गोवा) पर्यंत न जाता हुबळीलाच थांबणार असल्याने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

या ब्लॉक मुळे वास्को-द-गामा आणि हुबळी दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे.

१. हुबळीपर्यंतच धावणाऱ्या गाड्या (Short Termination)

खालील गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकाऐवजी हुबळी (Hubballi) स्थानकावर थांबतील आणि तेथूनच परतीच्या प्रवासाला निघतील. म्हणजेच हुबळी ते वास्को-द-गामा दरम्यान या गाड्या रद्द राहतील:

शालिमार – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१८०४७): २५ एप्रिल ते ४ जून दरम्यानच्या ठराविक तारखांना ही गाडी हुबळीपर्यंतच धावेल.

तिरुपती/हैदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७४१९/१७०२१): ३० एप्रिल ते ४ जून दरम्यान (दर गुरुवारी) हुबळीपर्यंत धावेल.

सिकंदराबाद – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७०३९): २९ एप्रिल ते ५ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

जसिडिह – वास्को-द-गामा एक्सप्रेस (१७३२२): २७ एप्रिल ते १ जून दरम्यान हुबळीपर्यंत धावेल.

 

२. हुबळीवरून सुटणाऱ्या गाड्या (Partial Cancellation)

परतीच्या प्रवासात खालील गाड्या वास्को-द-गामा ऐवजी हुबळी स्थानकावरून आपल्या नियोजित वेळेनुसार सुटतील:

वास्को-द-गामा – शालिमार एक्सप्रेस (१८०४८): २८ एप्रिल ते ७ जून.

वास्को-द-गामा – तिरुपती/हैदराबाद एक्सप्रेस (१७४२०/१७०२२): १ मे ते ५ जून.

वास्को-द-गामा – सिकंदराबाद एक्सप्रेस (१७०४०): ३० एप्रिल ते ६ जून.

वास्को-द-गामा – जसिडिह एक्सप्रेस (१७३२१): १ मे ते ५ जून.

 

३. गाड्यांच्या मार्गात बदल (Diversion)

काही लांब पल्ल्याच्या गाड्या घाट विभागातील काम टाळण्यासाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत:

गाडी क्रमांक व नाव वळवलेला मार्ग रद्द केलेले थांबे
११०९७ पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे – पनवेल – रोहा – मडगाव
सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, लोंढा इ.
११०९८ एर्नाकुलम – पुणे एक्सप्रेस मडगाव – रोहा – पनवेल – पुणे
मडगाव ते पुणे दरम्यानचे सर्व मुख्य थांबे
१७३१५ वास्को – वेलंकन्नी एक्सप्रेस मडगाव – मंगळुरू – शोरानूर – इरोड
हुबळी, दावणगेरे, तुमकुर, बेंगळुरू, सालेम इ.
१७३१६ वेलंकन्नी – वास्को एक्सप्रेस इरोड – शोरानूर – मंगळुरू – मडगाव
सालेम, बेंगळुरू, हुबळी, धारवाड, लोंढा इ.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवलेली दारू सापडली; इन्सुली येथे अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

   Follow us on        

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली आहे. या कारवाईत सुमारे ३.५० लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कारवाईचा तपशील

​राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरातील दत्त मंदिराजवळ वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका ‘महिंद्रा बोलेरो’ टेम्पोला पथकाने अडवले.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवली होती दारू

​संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची कसून तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट ठेवलेले आढळले. मात्र, हे क्रेट बाजूला केल्यावर त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स सापडले.

​एकाला अटक

​या प्रकरणी पोलिसांनी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत.

​जप्त केलेला मुद्देमाल:

​विदेशी दारू (३५ बॉक्स): ३,४९,३२० रुपये

​महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये

​एकूण किंमत: ८,४९,३२० रुपये

एमआरएफ टायर कंपनीत बंपर भरती; सिंधुदुर्गात २५० पदांसाठी मुलाखत

   Follow us on        

कुडाळ : भारतातील नामांकित एमआरएफ टायर कंपनीत प्रशिक्षणार्थी (Trainee) पदांसाठी तब्बल २५० जागांची भरती करण्यात आली असून, या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे.

ही भरती मनसेच्या माध्यमातून होत असून, निवड प्रक्रियेसाठी कंपनीची भरती टीम थेट ठिकाणी उपस्थित राहणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ जॉब लेटर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नोकरीचे ठिकाण फोंडा (गोवा युनिट) असून, उमेदवारांना दरमहा ₹१७,५०० ते ₹१९,००० इतका पगार मिळणार आहे. त्यासोबतच मोफत राहण्याची व कॅन्टीनची सोय, युनिफॉर्म तसेच भविष्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. दरवर्षी पगारात वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले.

शैक्षणिक पात्रता : ८वी ते १२वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार या भरतीस पात्र आहेत.

मुलाखतीचे तपशील :
🗓️ तारीख : १२ सप्टेंबर २०२५
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २.३०
📍 स्थळ : बै. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ

ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, सिंधुदुर्गातील तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

  • चौगुले : ९३८४०-०३३०५

  • खांडेकर : ९६९९२-९०२२४

गोव्याहून सोलापूरसाठी निघालेले विमान मागे फिरले; कारण काय?

   Follow us on        

गोवा: अलीकडेच सुरु झालेल्या सोलापूर ते गोवा विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, गोव्याहून सोलापूरकडे जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन पावसाळी सुट्ट्यांमध्ये अनेकांनी गोव्यात सहलीचे नियोजन केले होते, मात्र ही विमानसेवा ठप्प झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडले

फ्लाय ९१ या विमान कंपनीला तांत्रिक कारणामुळे शनिवारी (दि.१२) रोजी संध्याकाळचे उड्डाण रद्द करावे लागले. हे विमान उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरून ४.५ मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण करणार होते, यांनतर तांत्रिक कारणामुळे वैमानिकांनी उशीर होणार असल्याचे जाहीर केले. मात्र पुढे ६.३० पूर्वी सोलापूरात उतरणे शक्य नसल्याने अखेर हे उड्डाण रद्द करावे लागले.

गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने या सर्व प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे बिघडले. विमानतळ प्राधिकरण अधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले असून, सर्व प्रवाशांना तिकिटाचे शंभर टक्के पैसे परत केले जाणार आहेत.

सोलापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, मात्र या कमी कालावधीत १३०० हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता. अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी, यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search