गोवा:मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गोवा आणि कोकणात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी इंधनाचा साठा संपल्याचे फलक पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करत कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता थेट पर्यटन क्षेत्राला या इंधन टंचाईची झळ बसू लागली आहे.
इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होत नसल्यामुळे पेट्रोल पंप चालक हवालदिल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावरील काही पंपांवर वाहनांना केवळ हजार ते पंधराशे रुपयांचेच मर्यादित पेट्रोल-डिझेल दिले जात आहे. दुसरीकडे, सीएनजी (CNG) गॅस भरण्यासाठी वाहनधारकांना तब्बल ३ ते ४ तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे सुट्ट्या गावी घालवण्यासाठी आलेले चाकरमानी आणि पर्यटकांचा अमूल्य वेळ रांगेतच वाया जात आहे.
इंधनाच्या या तीव्र टंचाईमुळे पर्यटकांच्या फिरण्यावर मोठ्या मर्यादा आल्या असून, येत्या ३ ते ४ दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची आणि पेट्रोल पंप पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोकण किंवा गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल, तर प्रवासाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.


