रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या आंबा घाटातील साखरपा परिसराजवळ आज (१३ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कनकवली तालुक्यातील तोंडवली येथील विलास रामचंद्र बोभाटे हे कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने आयशर टेम्पो (क्र. एमएच ०७ एजे ६५५८) घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
पहाटेच्या सुमारास गोरेवाडी बसथांब्यासमोर त्यांच्या चालն्या टेम्पोचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक पंक्चर झाल्यामुळे त्यांनी वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले होते. याच दरम्यान, लांजा आगाराची धाराशिव-लांजा एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ४८३५) घेऊन चालक जितेंद्र संभाजी पाटील हे प्रवास करत असताना, त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता खूप मोठी असल्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांना जोरदार दुखापत झाली. या दुर्घटनेमध्ये एसटी बसचे वाहक रोकडेश्वर पिराजी तोटेवाड, फुलाजी बत्तलवाड आणि वैष्णवी बत्तलवाड (सर्व रा. लांजा) यांच्यासह बसमधील इतर प्रवासी मिळून एकूण नऊ जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला, त्यानंतर साखरपा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सुजित पाटील आणि पोलीस वाहनचालक स्वप्नील कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने तातडीने प्रसंगवधान राखत सर्व जखमी प्रवाशांना पोलीस वाहनातून साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, जिथे त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले.
जखमींच्या प्रकृतीची गांभीर्य लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या संपूर्ण अपघाताची रीतसर नोंद करून साखरपा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू आहे.


