रॉकेट व हवेत उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी; प्रशासनाकडून कडक आदेश लागू

 

   Follow us on        

​ठाणे जिल्ह्यामध्ये सध्याच्या काळात वेगवेगळ्या अकरा ठिकाणी आगी लागल्याचे गंभीर प्रकार समोर आले असून यादरम्यान सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे नागरिकांच्या जिवावर मोठा धोका निर्माण झाला असून, काही नागरिक हवेमध्ये उडणारे रॉकेट आणि इतर तत्सम फटाके उडवत आहेत. काही व्यक्ती रॉकेट हातात धरून अत्यंत धोकादायक पद्धतीने ते उडवत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ओढवण्याची शक्यता वाढली आहे.

​या वाढत्या दुर्घटना रोखण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे, रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचे जळते अवशेष थेट नागरिकांच्या निवासी इमारती तसेच ज्वलनशील साहित्यावर पडत आहेत, ज्यामुळे आगी लागून जीवित व मालमत्तेची मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

​विशेष करून दाट लोकवस्तीच्या भागांत, इमारतींमधील रिफ्युज एरिया, वाहनतळ तसेच गच्चीवरून मोठ्या प्रमाणावर रॉकेट व उडणारे फटाके उडवले जात आहेत. अशा प्रकारच्या बेजबाबदार कृत्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना घडल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर बाबींची खात्री पटल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्णा पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलमांनुसार हे कडक आदेश जारी केले आहेत.

​या नवीन आदेशानुसार, संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रॉकेट किंवा इतर उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. हा नियम सार्वजनिक तसेच खासगी जागा, इमारतींच्या गच्ची, बाल्कनी, आवार आणि सर्व रहिवासी भागांत काटेकोरपणे लागू असणार आहे. हा संपूर्ण प्रतिबंधक आदेश दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या रात्री १२:०० वाजल्यापासून ते दिनांक ८ जानेवारी २०२७ रोजीच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अमलात राहील.

​संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशामक विभागाने या आदेशाची कडक अंमलबजावणी करून त्याची व्यापक प्रसिद्धी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गृहेनिर्माण संस्थांनी आपल्या सदस्यांना या आदेशाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले असून, या आदेशाचे पालन करण्यास नकार देणाऱ्या किंवा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search