या सुविधेचा विस्तार करण्यासाठी आणि अधिकाधिक ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारकडून देशभरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यादरम्यान, १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संपूर्ण देशात ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५.०’ मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून ज्येष्ठ पेन्शनधारक चेहरा ओळखण्याच्या (फेस रेकग्निशन) प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन अगदी सहजपणे आपले डिजिटल जीवन प्रमाणप्रत्र ऑनलाइन सादर करू शकतील.
ही डिजिटल प्रक्रिया पूर्ण करताना पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करताना जर काही तांत्रिक अडचणी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यास, त्यांच्या त्वरित निवारणासाठी या मोहिमेदरम्यान विशेष तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पेन्शनधारकांच्या सर्व अडीअडचणींचे विनाविलंब आणि तातडीने निराकरण करण्यावर सरकारचा प्रामुख्याने भर असणार आहे.
घरबसल्या मोबाईलवरून हे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पेन्शनधारकांना सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमधील गुगल प्ले स्टोअरवरून ‘Jeevan Pramaan Face App’ आणि सोबतच ‘Aadhaar Face RD App’ हे दोन्ही अॅप्स डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागतात. त्यानंतर ‘जीवन प्रमाण’ अॅप सुरू करून आवश्यक त्या सर्व परवानग्या द्याव्या लागतात आणि आधार क्रमांक, मोबाईल नंबर तसेच ई-मेल आयडी टाकून नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागते. मोबाईलवर प्राप्त झालेला वन-टाइम पासवर्ड (OTP) भरून पडताळणी पूर्ण केल्यानंतर अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव नोंदवून संमतीच्या चेकबॉक्सवर क्लिक करावे लागते.
या संपूर्ण प्रक्रियेच्या शेवटी पडद्यावर येणाऱ्या ‘स्कॅन’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर ‘Aadhaar Face RD App’ द्वारे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू होतो. याद्वारे पेन्शनधारकाने कॅमेऱ्यासमोर चेहरा धरून अचूक छायाचित्र टिपणे आवश्यक असते, जेणेकरून आधारमधील माहितीशी चेहरा जुळल्यानंतर ओळख patalani पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित आवश्यक माहिती भरून, मोबाईलवर आलेला ओटीपी पुन्हा टाकून आणि सर्व माहितीची खात्री करून अर्ज सबमिट केल्यावर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होते, जे मोबाईलमध्ये जतन करून ठेवता येते व त्याची सद्यस्थिती तपासता येते.


