नवी मुंबईत मुख्यालय असलेल्या आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक मार्ग जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर मराठी भाषेला थेट चौदाव्या स्थानावर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विविध माहितीसाठी सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल पोर्टलवर इंग्रजीला पहिले तर हिंदीला दुसरे स्थान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कोकण रेल्वेचा रोहा ते ठोकूर यादरम्यानचा एकूण ७४१ किलोमीटरचा मार्ग असून, यातला सर्वात मोठा हिस्सा महाराष्ट्रातील ३७५ किलोमीटरचा आहे. असे असतानाही गोवा कोकणी, गुजराती, मणिपुरी, कानडा आणि मल्याळम यांसारख्या इतर अनेक भाषांना मराठीच्या आधी प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या आणि या रेल्वेसेवेचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या प्रवाशांची मायबोली मराठीच आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील नागरिकांकडून या प्रकारावर तीव्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वेबसाईटवर भाषा निवडीच्या पर्यायामध्ये मराठी भाषेला इतके दुय्यम स्थान दिल्यामुळे कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा थेट करोडो मराठी भाषकांचा अवमान असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात असून, यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


