Follow us on ![]()
![]()
माथेरान डोंगररांगांमध्ये उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे ४.१६ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे साकारण्यात आले आहेत. यापैकी एक बोगदा वाहतुकीसाठी सज्ज झाला असून दुसऱ्या बोगद्याचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात किंवा जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यात हे दोन्ही बोगदे सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या बदलापूर आणि पनवेल दरम्यान ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सर्वसाधारणपणे एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. मात्र, हा बोगदा सुरू झाल्यानंतर थेट पनवेल ग्रामीण भागातून बदलापूरला पोहोचणे अत्यंत जलद होणार असून हाच प्रवास केवळ १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा तब्बल एका तासाचा मौल्यवान वेळ वाचणार आहे.
मुंबई-दिल्ली महामार्गाच्या दृष्टिकोनातूनही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या रस्त्याने दिल्ली गाठण्यासाठी २२ ते २४ तास लागतात, रेल्वेने दुसरा दिवस उजाडतो आणि विमानाने अडीच तासांचा प्रवास करावा लागतो; परंतु या मार्गाचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबई ते दिल्ली रस्ते प्रवास केवळ १२ ते १४ तासांत शक्य होणार आहे. परिणामी प्रवाशांच्या वेळेसोबतच इंधन आणि खर्चातही मोठी बचत होईल.
नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरातील वाहतुकीचा ताण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा बोगदा उपयुक्त ठरेल. पनवेल आणि बदलापूर तालुक्यांना थेट जोडण्याबरोबरच पुढे मोरबे तसेच नैना आणि नियोजित दळणवळण प्रकल्पांच्या पट्ट्यालाही याचा फायदा मिळणार आहे.
या जोडणीमुळे संबंधित भागातील आर्थिक आणि पायाभूत विकासाच्या नव्या संधी खुल्या होतील. विशेषतः पनवेल तालुक्यातून नाशिक आणि पुढे नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार असून श्रम, वेळ आणि इंधन तिघांचीही लक्षणीय बचत होईल.


