दक्षिण रेल्वे विभागाने या नव्या प्रकल्पाची आखणी सुरू केली असून केरळमधील अलुवा आणि एर्नाकुलम जंक्शन या दोन स्थानकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. या दोन्ही स्थानकांवर प्रवाशांसाठी स्वतंत्र दरवाजे असलेले सुसज्ज एक्झिक्युटिव्ह लाऊन्ज, स्लिपिंग पॉड्स आणि हाय-स्पीड वाय-फाय यांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सध्या नियोजन पातळीवर सुरू आहे.
ज्या प्रवाशांच्या गाड्या रात्री उशिरा सुटतात किंवा भल्या पहाटे स्थानकावर पोहोचतात, अशा प्रवाशांची मोठी सोय या सुविधेमुळे होणार आहे. प्रत्येक पॉडची रचना प्रवाशांच्या वैयक्तिक आरामाचा विचार करून करण्यात आली असून त्यामध्ये रिक्लायनिंग बेड, हवामान नियंत्रित करण्याची सोय, प्रायव्हसीसाठी लॉक असलेला दरवाजा, मोबाईल चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट्स, वाचनाचा स्वतंत्र दिवा आणि वेगवान इंटरनेटसाठी वाय-फाय दिले जाणार आहे.
बाहेरच्या खाजगी हॉटेल्समध्ये प्रवाशांना काही तास थांबायचे असले तरी संपूर्ण २४ तासांचे भाडे द्यावे लागते, ज्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागते. मात्र, रेल्वेच्या या नव्या योजनेत तासाप्रमाणे शुल्क आकारणी केली जाणार असल्याने प्रवाशांची मोठी आर्थिक बचत होणार आहे. प्रति तास ९९ रुपयांपासून या पॉड्सचे दर सुरू होणार असल्यामुळे प्रवासी जितका वेळ विश्रांती घेतील, तितक्याच कालावधीचे पैसे त्यांना भरावे लागतील.
दक्षिण रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांना स्थानकावरच एकांत आणि शांत वातावरणात विश्रांती घेण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल. महागड्या लॉज किंवा हॉटेलच्या तुलनेत अत्यंत माफक दरात दर्जेदार सुविधा मिळणार असल्याने रेल्वे प्रवाशांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार आहे.


