मालवणी गार्‍हाण्याने नवी मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवेचा श्रीगणेशा

   Follow us on        

मुंबई येथून झेपावलेले ‘फ्लाय ९०’ हे विमान सिंधुदुर्गात यशस्वीरीत्या दाखल झाल्याने कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली विमान सेवा प्रत्यक्षात अवतरली आहे. विमान प्रवासाची सुरुवात होत असतानाच प्रसिद्ध भजनी बुवा प्रमोद धुरी यांनी विमानात बसूनच मालवणी भाषेत देवाजवळ साकडं घातलं. ही विमान सेवा कोणतीही खंडन न पडता अखंडित चालू राजी राहू दे आणि या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे आरोग्य उत्तम राहू दे, अशी आर्त हाक त्यांनी देवाकडे दिली. या अनोख्या मालवणी गार्‍हाण्याला आणि परंपरेला मंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी पूर्ण दाद दिली.

​गोव्यातील मोपा विमानतळाची मोठी स्पर्धा, तांत्रिक अडचणी आणि एअरपोर्ट ऑथोरिटीच्या किचकट परवानग्या यांसारख्या अनेक आव्हानांवर मात करून हे शिवधनुष्य पेलण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणातल्या या विमानसेवेसाठी दाखवलेली जिद्द आणि मेहनत अत्यंत महत्त्वाची ठरली. हा मार्ग सुरू करणे अत्यंत आव्हानात्मक असतानाही प्रशासकीय पातळीवरील सर्व मंजुऱ्या आणि पूर्तता करून त्यांनी हा ऐतिहासिक दिवस घडवून आणला आहे.

​केंद्र सरकारमध्ये खासदार म्हणून काम केल्यामुळे विमानतळ सुरू करण्यामागील सर्व प्रशासकीय प्रक्रिया आणि त्यातील अडचणींची आपल्याला पुरेशी जाणीव होती, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. मंत्री दीपक केसरकर यांनाही या संपूर्ण प्रक्रियेची पूर्ण कल्पना असल्याने प्रत्यक्षात साकार झालेले हे काम किती कठीण होते, याची प्रचिती येते. या सगळ्या प्रवासात कोणतीही प्रसिद्धी न मिळवता किंवा गाजावाजा न करता सर्वांनी मिळून हे कठीण काम यशस्वीरीत्या मार्गी लावले आहे.

​चीपी विमानतळावरून सुरू झालेली ही विमानसेवा भविष्यात कधीही खंडित होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. विमानतळावर मेहनत घेणाऱ्या संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच ही सुविधा उभी राहिली असून, कोणत्याही अंतर्गत मतभेदांमुळे किंवा चुकीमुळे या सेवेवर विपरीत परिणाम होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या समृद्धीसाठी आणि पर्यटनाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या सुविधेमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला नवा वेग मिळणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search