महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि ठरवून दिलेल्या नियमांनुसारच राबवावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. भरतीसाठी बाह्य संस्थांमार्फत निवड करताना ती महामंडळाने ठरवून दिलेल्या पात्रतेच्या निकषांनुसारच केली जावी, जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही.
सध्या काही गरजू आणि बेरोजगार तरुणांना नोकरीचे खोटे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकारामुळे नोकरीच्या अपेक्षेने संबंधित संस्थांवर विश्वास ठेवणारी तरुण मंडळी आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत, ज्यामुळे महामंडळाच्या प्रतिमेला देखील मोठा धक्का पोहोचत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही ठराविक व्यक्तींच्या गैरकृत्यांमुळे थेट एसटी महामंडळाच्या जनमानसातील विश्वासाहृतेलाच मोठा धोका निर्माण होत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेत महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत या सर्व बेकायदेशीर प्रकारांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
उमेदवारांची दिशाभूल किंवा आर्थिक फसवणूक करणाऱ्या खासगी संस्था तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व दोषी व्यक्तींची तात्काळ ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करावेत, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्यात. भरतीच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांना अजिबात पाठिशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही बैठकीत देण्यात आला आहे.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उच्च विश्वासार्हता कायम टिकवून ठेवण्यासोबतच सर्व पात्र उमेदवारांच्या हिताचे तडाखा न बसता संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे एसटी महामंडळातील आगामी भरती प्रक्रिया अधिक काटेकोरपणे पार पडेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.


