मंगळुरू एक्सप्रेसमध्ये बॅगेचे लॉक तोडून ९ लाखांच्या दागिन्यांची चोरी

   Follow us on         कणकवलीहून मुंबईकडे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या कासार्डे येथील चव्हाण दांम्पत्याने मंगळूरू एक्सप्रेस ट्रेनच्या एस-०३ डब्यातून प्रवास केला होता. प्रवास दरम्यान त्यांनी आपली ट्रॉलीबॅग सीटखाली ठेवली होती आणि रत्नागिरी व रोहा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या प्रवासात अज्ञात व्यक्तीने बॅगेचे कुलूप तोडले.

​चोरट्यांनी बॅगेतील प्लॅस्टिकच्या पांढऱ्या पिशवीची चेन उघडून अंदाजे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. यामध्ये ५० ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले सोन्याचे गंठण आणि २०१८ मध्ये बनवून घेतलेले सोन्याचे गोठ यांचा समावेश आहे.

​चोरीला गेलेल्या दागिन्यांची खरेदीवेळची किंमत दोन लाख ३४ हजार रुपये असली, तरी सध्याच्या बाजाराभावानुसार त्यांची अंदाजे किंमत तब्बल नऊ लाख रुपये होत आहे. या घटनेमुळे प्रवासादरम्यान चव्हाण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

​प्रवास संपल्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर ही चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून अधिकृत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

​फिर्यादी महेश चव्हाण हे एका पायाने अपंग असून, आधीच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या या कुटुंबावर या चोरीच्या घटनेमुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त विनंती पीडित कुटुंबाने केली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search