सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वेलें गावातील फौजदारवाडी आणि लिंगवतवाडी येथील ग्रामस्थांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागाचा एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. कोणत्याही शासकीय निधीची, आमदार-खासदार निधीची अथवा जिल्हा नियोजन समितीच्या मदतीची वाट न पाहता गावकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि श्रमदानातून एक सुसज्ज बसथांबा उभारला आहे.
या परिसरात एसटी बसची वाट पाहताना महिला, शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांना ऊन आणि पावसाचा सामना करावा लागत होता. प्रवाशांची ही मोठी अडचण लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत, सतीश लिंगवत आणि विश्राम बाबू लिंगवत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रस्त्यालगतची आपली मोक्याची जागा कै. लक्ष्मण सोमालींग लिंगवत आणि कै. काशीबाई पुंडलिक लिंगवत यांच्या स्मरणार्थ बसथांब्यासाठी दान दिली, ज्यानंतर या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली.
जागा उपलब्ध झाल्यावर गावातील तरुणांनी कामाचे नियोजन केले आणि सुमारे १०१ गावकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. कोणी रोख रकमेच्या स्वरूपात, तर कोणी सिमेंटची पोती आणि बांधकाम साहित्य देऊन या कार्यात हातभार लावला. अवघ्या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत आणि महिन्याभराच्या आत ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा बसथांबा पूर्णत्वास आला. १५ सप्टेंबर रोजी भूमिपूजन झालेल्या या बसथांब्याला सरपंच रुचिता राऊळ, बाळू गावडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी पूर्ण पाठिंबा दिला.
विशेष म्हणजे, या बसथांब्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पुढाऱ्याला आमंत्रित करण्यात आलेले नाही. ज्या सामान्य ग्रामस्थांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनी आर्थिक मदत, साहित्य आणि श्रमदान केले आहे, त्यांच्याच हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी हा सोहळा पार पडणार आहे. या स्वावलंबनाचे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही कौतुक केले असून ते कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
वेलें गावातील नागरिकांनी सामूहिक प्रयत्नांतून काम करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही त्यांनी श्रमदानातून स्वतः रस्ता तयार केला होता. मूलभूत गरजांसाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेण्याची ही वृत्ती इतर गावांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.


