गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दारूबंदीचा नियम मोडत दुचाकींच्या पेट्रोल टाकी आणि सीटखाली देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ १८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भरधाव येणाऱ्या दोन दुचाकींची कसून तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तानाजी नानाजी पेंदोरकर आणि सौरभ प्रकाश महाजनवार अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड येथील रहिवासी आहेत.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ‘रॉकेट संत्रा’ या ब्रँडच्या ९० मिली क्षमतेच्या प्रत्येकी २०० बाटल्या असलेले दोन साठे हस्तगत केले. एकूण ४०० देशी दारूच्या बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


