कोकणच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असताना, या मार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी चिपळूणमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या मागणीला सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळवून देण्यासाठी शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आणि आंबेडकरी अनुयायी एकत्र आले आहेत. या सामूहिक पुढाकारातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय महामार्ग नामाभिधान समन्वय समिती’ अस्तित्वात आली आहे.
शहरातील डॉ. आंबेडकर स्मारक भवन येथे शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत हा लढा केवळ एका गटापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण कोकणातील समविचारी संघटनांना यात सामावून घेण्याचा ठराव करण्यात आला. शासनाच्या सर्व स्तरांवर निवेदने सादर करून, चर्चा घडवून आणत आणि सतत पाठपुरावा करून ही मागणी मान्य करून घेण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला.
सामाजिक प्रबोधन आणि समतेच्या चळवळींची मोठी परंपरा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे हे मूळ गाव आहे. त्यामुळे या महामार्गाला त्यांचे नाव दिल्यास कोकणच्या मातीशी असलेले त्यांचे ऐतिहासिक नाते अधोरेखित होईल, अशी भावना उपस्थितांनी मांडली. हा विषय केवळ नामकरणाचा न राहता कोकणच्या ऐतिहासिक वारशाशी जोडलेली चळवळ म्हणून पुढे नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या चर्चेत चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, उपाध्यक्ष नाना सावंत, बौद्धजन उत्कर्ष समितीचे अध्यक्ष समाजभूषण शीलभद्र जाधव यांच्यासह काशीराम कदम, रमाकांत सकपाळ, राजूभाई जाधव, संदेश मोहिते, डॉ. अशोक सकपाळ, सुनिल गमरे, मिलिंद कदम, संजय गमरे, प्रभाकर सकपाळ, संजय कदम, प्रवीण जाधव, विलास जाधव, सचिन मोहिते आणि उमेश सकपाळ यांनी सहभाग घेतला. तसेच अनंत पवार, रोहित कदम, जितेंद्र जाधव, अनंत मोहिते, अनिकेत कांबळे, सुनिल जाधव, अरुण मोहिते, प्रणय जाधव, आकाश कांबळे आणि स्वप्निल पवार हे कार्यकर्तेही उपस्थित होते.
या मोहिमेचे नियोजन करण्याची जबाबदारी संदेश मोहिते, शीलभद्र जाधव, राजूभाई जाधव, मिलिंद कदम, प्रवीण जाधव, सचिन मोहिते, उमेश सकपाळ आणि आकाश कांबळे या आठ पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ही समिती संपूर्ण कोकणातील विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चळवळीचा विस्तार करेल, तर मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी पुढील आंदोलनात्मक आणि प्रशासकीय पावले ठरवण्यासाठी पुन्हा बैठक होणार आहे.


