नवीन सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेसचा आधार घेत रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरू करण्यास रेल्वेचा नकार

   Follow us on        

मुंबई: कोकणातील ग्रामीण प्रवाशांची जीवनवाहिनी मानली जाणारी ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्यास मध्य रेल्वेने पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत नकार दिला आहे. जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक आणि अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जावर मध्य रेल्वेच्या मुख्य परिचालन प्रबंधक कार्यालयाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या उत्तरात हा खुलासा केला आहे. दादर स्थानकावरील टर्मिनलच्या मर्यादा आणि दिवा-दादर रेल्वे मार्गावरील गर्दीमुळे ही पॅसेंजर गाडी पुन्हा चालवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच, ८ सप्टेंबर २०२६ पासून १५०८७/१५०८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड ही नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली असून तिला दादर येथे थांबा देण्यात आल्याचा युक्तिवाद रेल्वेने केला आहे.

​रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेवर कोकणातील प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, जल फाउंडेशनने रेल्वेच्या या दाव्याचे जोरदार खंडन केले आहे. १६ नोव्हेंबर १९९६ पासून २० मार्च २०२० पर्यंत अखंडपणे धावणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर कोरोना काळानंतर अचानक बंद करण्यात आली. आता नवीन एक्सप्रेस गाडी सुरू झाल्यामुळे पॅसेंजर गाडीची गरज संपल्याचे रेल्वेकडून भासविले जात आहे, जे पूर्णपणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पॅसेंजर आणि एक्सप्रेस या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या सेवा असून, केवळ एक्सप्रेस सुरू केल्याने सर्वसामान्य आणि ग्रामीण प्रवाशांची पॅसेंजर गाडीची गरज संपुष्टात येत नाही.

​नवीन मुंबई-सावंतवाडी एक्सप्रेसला रत्नागिरी-दादर पॅसेंजरच्या बहुतांश महत्त्वाच्या स्थानकांवर थांबाच देण्यात आलेला नाही. परिणामी नागोठणे, कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजणी, कामथे, कडवई, उक्षी आणि भोके यांसारख्या स्थानकांवरील प्रवाशांचा मुंबईशी असलेला थेट रेल्वे संपर्क आजही तुटलेलाच आहे. पॅसेंजर गाडी बंद झाल्यापासून या भागातील प्रवाशांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​याशिवाय, दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात तब्बल नऊ तासांचे मोठे अंतर असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दुपारच्या सत्रात मुंबईहून सुटत असल्याने ती पेण ते खेड आणि रत्नागिरीदरम्यानच्या प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची होती. याउलट, नवीन एक्सप्रेस रात्री मुंबईतून सुटते आणि पेण ते खेड विभागातील स्थानकांवर मध्यरात्री १ ते ३ च्या दरम्यान पोहोचते. अशा मध्यरात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील स्थानकांवर उतरून घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने हा प्रवास प्रवाशांसाठी अव्यवहार्य ठरत आहे.

​मध्य रेल्वेने स्वतः १४ मे २०२६ रोजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरचा दादरपर्यंत विस्तार करण्याचा सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नसताना आता एक्सप्रेस गाडीचा बादरायण संबंध जोडून पॅसेंजरची मागणी डावलणे अन्यायकारक असल्याचे नितीन जाधव यांनी स्पष्ट केले आहे. एक्सप्रेस आणि पॅसेंजर यांची तुलना न करता, १४ मे २०२६ च्या प्रलंबित प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने तातडीने मंजुरी देऊन रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करावी, अशी ठाम मागणी जल फाउंडेशन कोकण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search