कारिवडे -गवळीवाडी येथे गुरुवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. माडखोल गावातील स्वप्नील संतोष लातये आणि आनंद हेमा म्हालटकर हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. त्यांच्या पुढे जात असलेल्या एका कॅन्टरचा वरचा भाग झाडाच्या फांदीला अडकल्यामुळे त्यावरील गांधील माशांचे पोळे थेट त्यांच्या दुचाकीवर कोसळले.
पोळे अंगावर पडल्यानंतर माशांनी या दोन्ही दुचाकीस्वारांवर जोरदार हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांच्या पाठोपाठ येणारे कारिडे येथील शिवसेना उपविभागप्रमुख रवी परब यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांच्या अंगावर चादर टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत शेकडो माशांनी त्यांना बेदम चावले होते.
गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील लातये आणि आनंद म्हालटकर यांना तत्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना सावंतवाडीतीलच एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी आनंद म्हालटकर यांची प्राणज्योत मालवली, तर स्वप्नील लातये यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय, या बचावकार्यात रवी परब, सुभाष परब आणि इतर एका व्यक्तीवरही माशांनी हल्ला केल्याने त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मृत आनंद म्हालटकर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आणि त्यांच्या पश्चात तीन लहान मुली, आई, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिन्ही मुली लहान असून वडिलांचे छत्र हरवल्यामुळे आणि आधीच गरिबीची परिस्थिती असल्यामुळे म्हालटकर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा त्यांचे पार्थिव माडखोल गावात आणल्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती, आणि यावेळी त्यांच्या तिन्ही मुलींचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून आले.
या आकस्मिक आणि दुर्दैवी घटनेमुळे माडखोल व ओटवणे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या रस्त्यांवरील धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. एका छोट्याशा दुर्घटनेने हसतखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे


