सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले दिवंगत नायब तहसीलदार मनोज शंकर मुसळे यांच्या मुलीला अनुकंपा तत्त्वावर अवघ्या २० दिवसांत शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संवेदनशीलतेने आणि तत्परतेने निर्णय घेत कु. सानिका मनोज मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी पदाचा नियुक्ती आदेश प्रदान केला.
नायब तहसीलदार कै. मनोज शंकर मुसळे यांचे ११ ऑगस्ट २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने त्यांची मुलगी कु. सानिका मुसळे यांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता.
या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर केल्यापासून अवघ्या २० दिवसांत नियुक्ती आदेश देण्यात आला. सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते कु. सानिका मुसळे यांना ग्राम महसूल अधिकारी (सजा तरंदळे, तहसीलदार कार्यालय, कणकवली) या पदाचा नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला.
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात आधार देण्याच्या दृष्टीने अनुकंपा नियुक्ती महत्त्वाची ठरते. प्रशासकीय प्रक्रियेत संवेदनशीलता आणि तत्परतेला प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मुसळे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. याबद्दल मुसळे परिवाराने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले


