खासदार नारायण राणे यांनी २१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. धुळे येथील स्थानिक नागरिक गणेश शंकरलाल शर्मा यांच्या निवेदनाची दखल घेत राणे यांनी ही मागणी केली. धुळे रेल्वे स्थानकाचा टप्प्याटप्प्याने ‘उगम-समाप्ती स्थानक’ अर्थात टर्मिनस म्हणून विकास करण्याबाबतची तांत्रिक, कार्यान्वित आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याची विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे.
धुळे स्थानकात रेल्वे गाड्यांची देखभाल, दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे यार्डची पुनर्रचना करणे, फलाटांची लांबी वाढवणे, पिट लाईनची सोय करणे, तसेच रेक उभे करण्याची व्यवस्था निर्माण करणे यांसारख्या विविध विकासकामांची टप्प्याटप्प्याने आखणी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
या पायाभूत सुविधा तयार झाल्यास कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यात थेट गाड्या धावू शकतील. यामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होण्यासोबतच कोकणातील पर्यटन उद्योग, स्थानिक रोजगार निर्मिती आणि व्यापाराला मोठा वेग मिळेल. याशिवाय, धुळे हे मध्य प्रदेश आणि गुजरातशी रेल्वेने जोडलेले असल्याने, या शेजारील राज्यांतील पर्यटकांनाही कोकणात येणे सोपे होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन ग्राहकवर्ग उपलब्ध होईल.
भविष्यातील प्रवाशांची संख्या आणि रेल्वेच्या दीर्घकालीन विस्ताराचा विचार करून रेल्वे बोर्ड व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती राणे यांनी पत्राद्वारे केली आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास राज्यातील दोन महत्त्वाच्या भागांमधील दळणवळण सुलभ होऊन व्यापार आणि प्रादेशिक अर्थकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धुळे स्थानकाचा टर्मिनस म्हणून कायापालट झाल्यास धुळ्यासह नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना याचा थेट फायदा होईल. भविष्यात मनमाड-इंदूर आणि बोरविहीर-नरडाणा या नव्या रेल्वे मार्गांशी धुळे टर्मिनस जोडले गेल्यास, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोकणाशी जोडणारे धुळे हे एक प्रमुख रेल्वे केंद्र म्हणून उदयास येईल. यामुळे प्रवाशांच्या सेवेसोबतच कृषी मालवाहतूक आणि उद्योगांनाही मोठा दिलासा मिळेल.


