निवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ १९ मे २०२६ रोजी निवती रॉकजवळ २२ मीटर खोलीवर बुडवून त्यातून भारतातील पहिले समुद्राखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ खडक उभारण्याचा प्रकल्प साकारला जात आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी २४ आसनी बॅटरीवर चालणारी पाणबुडी तयार करण्याचे काम वेगवान झाले आहे. त्यामुळे स्कूबा आता स्कूबा डायव्हिंग न करता ‘गुलदार’ युद्धनौका पाहता येणार!
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर नेणाऱ्या या उपक्रमामुळे पाण्याखालील पर्यटनासोबतच सागरी जैवविविधतेच्या संवर्धनालाही मोठा हातभार लागणार आहे. बुडवलेल्या जहाजाभोवती वेळानुसार प्रवाळे वाढून मासे व इतर सागरी जीवांना नवा निवारा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी एकूण १६० कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, त्यातील केंद्राकडून ४६.९१ कोटी आणि राज्याकडून ११२.४६ कोटी असे मिळून १५९.३७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. स्कुबा डायव्हिंग न करता थेट जहाजाचे दर्शन घेता यावे यासाठी उभारल्या जाणाऱ्या या २४ आसनी बॅटरीचलित पाणबुडीची उभारणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स (एमडीएल) यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यासाठी ११०.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडी बांधणीचे काम सध्या सुरू असून २०२७ च्या अखेपर्यंत ही सेवा पर्यटकांसाठी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाच्या दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली असून २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील कार्यक्रमात या उपक्रमाला ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड – गोल्डन बॅनियन अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे.


