थर्मल ड्रोनचा गैरवापर करून तिलारी खोर्‍यातील वन्यप्राण्यांची शिकार?

   Follow us on        

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींच्या बंदोबस्तासाठी वापरल्या जाणाऱ्या थर्मल ड्रोनचा गैरवापर करून इतर वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक संजय जयराम सावंत यांनी केला आहे. या भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर शिकारीवर आळा घालण्यासाठी त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

​जैवविविधतेने संपन्न असलेल्या तिलारी खोऱ्यातील वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, वाघांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा आणि अवैध शिकारीला पायबंद बसावा, या उद्देशाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात मानद वन्यजीव रक्षक तथा वनश्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय जयराम सावंत यांच्यासह सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक भाग्यश्री परब, ‘WWA’ चे समन्वयक मंदार गावडे आणि वन्यजीव अभ्यासक अभिजित सिनारी हे उपस्थित होते.

​तिलारी खोऱ्याबरोबरच संवेदनशील वनक्षेत्रात रात्रीच्या वेळी थर्मल ड्रोन उडवण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे. अंधारात ड्रोन वापरण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्याने हा प्रकार वन्यजीव सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेसाठी संशयास्पद आणि धोकादायक ठरत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून ड्रोन चालकांप्रमाणेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्यांवरही कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​तिलारी खोऱ्यातील वाघ, बिबटे तसेच इतर दुर्मीळ व शेड्यूल-१ मधील वन्यजीवांच्या अधिवासात होणारी अवैध शिकार रोखण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी एकत्रित गस्त घालून कडक पावले उचलावीत, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच हत्ती बाधित आणि संवेदनशील वनभागात हौशी पर्यटक व सोशल मीडिया युजर्सकडून खासगी ड्रोनद्वारे अनधिकृत चित्रण सुरू असल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक दिनचर्येत बाधा येऊन ते मानवी वस्त्यांकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

​ड्रोनच्या माध्यमातून जंगलातील पाणवठे आणि वन्यजीवांच्या भ्रमंती मार्गांची अचूक माहिती सोशल मीडियावर टाकली जात असल्याने ती शिकाऱ्यांपर्यंत पोहोचून वन्यजीवांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे परवानगीशिवाय दिवसा किंवा रात्री ड्रोन उडवणाऱ्यांवर ‘वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२’ आणि ‘भारतीय न्याय संहिते’नुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, तसेच जंगलाशेजारील गावांतील रहिवाशांची, विशेषतः महिलांची वैयक्तिक गोपनीयता अबाधित राखावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

​या सर्व गंभीर मुद्द्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी रात्रीच्या थर्मल ड्रोन वापराची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. वन्यजीव संरक्षण आणि अवैध शिकारीला रोखण्यासाठी वनविभागाची भूमिका महत्त्वाची असल्याने सावंतवाडी वनविभागाच्या उपवनसंरक्षकांशीही सविस्तर चर्चा झाली असून, वनविभाग व पोलिसांच्या समन्वयातून दोषी व संबंधितांवर निश्चितच कठोर कारवाई होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search