राजापूरमध्ये सापडलेल्या दस्तऐवजांतून अठराव्या शतकातील ओझरच्या वतनविवादाचा उलगडा

   Follow us on        

राजापूर तालुक्यातील ओझर गावाशी संबंधित अठराव्या शतकातील दोन महत्त्वपूर्ण मोडी दस्तऐवज इतिहास अभ्यासकांसमोर आले आहेत. राजापूरच्या भटाळी येथील संदीप सरखोत यांनी हे मूळ दस्तावेज इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना उपलब्ध करून दिले असून, नाशिक येथील रामनाथ रावळ यांनी त्याचे वाचन केले आहे. साधारण १७८९ मधील या कागदपत्रांमुळे कोकणातील जुनी प्रशासकीय आणि सामाजिक रचना समजून घेण्यास मोठा हातभार लागला आहे.

​यातील पहिल्या कागदपत्रानुसार शके १७०८ मध्ये महादाजी कृष्ण यांना अपत्य नसल्‍याने वतनाच्या वारसाचा आणि दत्तकपुत्र घेण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. रामाजी गणेश यांच्याकडे दत्तकपुत्राची मागणी करताना सदाशिव भटजी घागवे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती. यात महादाजी कृष्ण यांचा सांभाळ, खोती-पाटीलकी, मानपान आणि चार वतनांच्या करारापोटी सरकारमध्ये ३०० रुपये नजर भरल्याची नोंद सापडली आहे.

​दुसऱ्या दस्तऐवजात वतनाच्या कारभारावरून निर्माण झालेल्या वादावर प्रकाश टाकला आहे. महादाजी कृष्ण यांच्या आर्थिक व्यवहारांमुळे वतन धोक्यात आल्याचा आरोप करून सुमारे २० बिघे शेतजमीन आणि ५० ते ६० बिघे वरकस जमिनीच्या व्यवहारांची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात तीन वर्षांचा हिशेब, कागदपत्रे आणि चीजवस्तू परत मागितल्याचे दिसून येते.

​या वादात त्रिकलाजी शेठ, गोपाळ अनंत गोखले आणि परमानंद पाध्ये यांचे संदर्भ देखील आढळतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वतन किंवा गाव सावकारी व्यवहारात विकत न घेता केवळ सावकारी ऐवज वसूल करावा, अशी तंबी विजयदुर्गचे सरखेल आंग्रे यांनी दिल्याचे या दस्तऐवजात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

​इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्या मते, ही कागदपत्रे तत्कालीन कोकणातील वारसाहक्क, महसूलव्यवस्था, कर्जवाटप आणि स्थानिक प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय मोलाचा प्राथमिक स्रोत ठरतील. या नोंदींचा सखोल अभ्यास केल्यास अठराव्या शतकातील सामाजिक व आर्थिक जीवनातील अनेक अज्ञात पैलू सहजपणे उजेडात येऊ शकतात.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search