राज्यातील शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

   Follow us on        

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, गुंतवणूकदार, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले असून यामध्ये एकूण १४ ठरावांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा मिळावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांव्यतिरिक्त आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७६३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला ३ किलो तांदूळ आणि २ किलो गहू असे एकूण ५ किलो धान्य दिले जाईल.

​आर्थिक फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी स्वतंत्र ‘एमपीआयडी’ न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून, ९० दिवसांत खटल्यांचा निकाल लावण्याची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. फसवणूक करणाऱ्या संस्थांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘१ जिल्हा, १ अपील’ ही प्रणाली १ एप्रिलपासून लागू करण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. याशिवाय दस्त नोंदणी आणि अपील शुल्कातील दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ३२ (ब) आणि कलम ५३ (१अ) मध्ये सुधारणा करणारे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडले जाणार आहे.

​शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठीही विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. आरोग्य विज्ञान शाखेतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस) घटकांतील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने लाभ मिळणार असून, भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांप्रमाणेच खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता मिळाली आहे. शालार्थ प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह बँकेत नोंदणीकृत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांद्वारे आर्थिक सक्षमीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

​खासगी अनुदानित शाळांचे नियमन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ‘महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमण) विधेयक, २०२६’ चा मसुदा तयार करून तो विधिमंडळात सादर करण्यास मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ (एनसीएएचपी कायदा) मधून अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धती वगळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा विधेयकाच्या प्रारुपालाही मंजुरी देण्यात आली आहे.

​कामगार वर्ग आणि नागरिकांच्या सेवेशी संबंधित कायद्यांमध्येही अद्ययावत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम, १९८१ या दोन्ही कायद्यांमध्ये काळानुसार आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद आणि सुलभ मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींमध्ये बदल करणारे विधेयक विधिमंडळासमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search