दोडामार्ग तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी आता थेट दिल्ली दरबारी चर्चा होणार आहे. गोव्याचे माजी जलसंपदामंत्री दयानंद मांद्रेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नारायण नाईक यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला असून, येत्या २१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली.
मागील अनेक वर्षांपासून हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या जिवितालाही धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार ठप्प होत असल्याने संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हत्तींच्या दहशतीतून कायमची मुक्ती मिळावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
या निर्णायक बैठकीत तालुक्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त कर्मचारी असे एकूण १५ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, मोर्ले गावच्या माजी सरपंच सुजाता संजय मणेरीकर आणि हेवाळेच्या माजी सरपंच व प्रशासक साक्षी संदीप देसाई यांचा समावेश असणार आहे.
तसेच शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग उप तालुकाप्रमुख मायकेल लोबो यांच्यासह नामदेव गवस, रामदास नाईक, सुर्याजी झेंडे, गणपत दळवी, प्रशांत दळवी, अंकुश गवस, ज्ञानेश्वर सावंत आणि सूचन कोरगावकर हे मान्यवर देखील या बैठकीत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे संजय नाईक यांनी स्पष्ट केले आहे.


