अंतर २० किमी.. वेळ ३ तास? मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या ‘स्लॅक टाईम’ मुळे प्रवासी नाराज

   Follow us on        

मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या १५०८७/१५०८८ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावरून कोकणातील रेल्वे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः १५०८७ मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या नियोजनात कुडाळ ते सावंतवाडी या अवघ्या काही किलोमीटर अंतरासाठी तब्बल तीन तासांचा ‘स्लॅक टाईम’ म्हणजेच अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या अजब नियोजनावर प्रवाशांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे वेळापत्रक नेमक्या कोणत्या निकषांवर आधारित आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली जात आहे.

​कुडाळ ते सावंतवाडी या अत्यंत कमी अंतराच्या प्रवासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळ राखून ठेवण्याची नेमकी काय आवश्यकता आहे, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. या अतिरिक्त वेळेमुळे गाडीच्या एकूण प्रवासाचा कालावधी विनाकारण वाढणार असून, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तसेच या ‘स्लॅक टाईम’चा गैरवापर होऊन ही गाडी दररोज अधिकृतरीत्या विलंबाने धावण्याची भीतीही प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे १५०८८ सावंतवाडी-मुंबई एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातील बदलांबाबतही प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सावंतवाडीवरून ही गाडी संध्याकाळी ६ ते ७.३० च्या दरम्यान सोडली असती, तर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदार व इतर प्रवाशांसाठी ती अत्यंत सोयीची ठरली असती. मात्र, नव्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार ही गाडी ठाणे येथे पहाटे ४ वाजेच्या सुमारास आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ६ वाजता पोहोचणार असल्याचे समजते.

​पहाटेच्या वेळी ठाणे स्थानकात उतरावे लागल्यास पुढील प्रवासासाठी ताटकळत राहावे लागणार असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. यापूर्वी ठाणे येथे सकाळी ५.५५ वाजता पोहोचण्याची वेळ प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीची होती. नव्या वेळापत्रकात मुंबईतील अंतिम स्थानकावर पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याने, प्रवाशांच्या सोयीपेक्षा केवळ वेळापत्रकाची औपचारिकता पाळली जात आहे का, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

​प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सोयीस्कर रेल्वेसेवा मिळणे अपेक्षित असताना या नव्या नियोजनामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १५०८७/१५०८८ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचा तात्काळ फेरविचार करून प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य द्यावे अशी मागणी होत आहे. कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी सांगितले की, मुंबई ते सावंतवाडी या एक्स्प्रेसला सावंतवाडीत पोहोचण्यासाठी १४ तास तर परत मुंबईला जाताना १२ तास ४० मिनिटे लागतात; कोकण रेल्वेच्या या वेळापत्रकात अजिबात तारतम्य नाही. त्यामुळे मुंबईहून सावंतवाडीला येताना स्लॅक टाईम कशासाठी ठेवला आहे, हे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले पाहिजे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search