सातबाऱ्यावर नाव नोंदीसाठी लाच मागितली! पिंगुळीचे तलाठी जितेंद्र खेताडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

   Follow us on         कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांनी सातबारा उताऱ्यावर नवीन नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या ऐवजाची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सिंधुदुर्ग युनिटने तात्काळ पावले उचलत शुक्रवारी सायंकाळी कुडाळ-वेगुर्ला मार्गावरील रेल्वे पुलाजवळ सापळा रचून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या धाडसी कारवाईमुळे संपूर्ण महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​या प्रकरणातील तक्रारदार हे ३५ वर्षीय वकील असून त्यांनी आपल्या अशिलाच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी पिंगुळी तलाठी सजा कार्यालयात रीतसर अर्ज सादर केला होता. या अर्जावर पुढील कारवाई व्हावी आणि कामाचा पाठपुरावा व्हावा यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी तलाठी जितेंद्र खेताडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे शासकीय काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी तलाठ्याने उघडपणे ५ हजार रुपयांच्या लाचेची अट घालती.

​शासकीय कामासाठी बेकायदेशीरपणे पैसे देण्याची तक्रारदाराची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचे ठरवले. त्यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयात जाऊन तलाठी खेताडे यांच्याविरोधात रीतसर तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने पिंगुळी येथील तलाठी कार्यालयात जाऊन लाचेच्या मागणीची गुप्तपणे पडताळणी केली, ज्यामध्ये तलाठी खेताडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले.

​मागणी निश्चित झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला पकडण्यासाठी नियोजनबद्ध सापळा रचला. कार्यालयात भेट न झाल्यामुळे तक्रारदाराने तलाठी खेताडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला, त्यावेळी खेताडे यांनी त्यांना लाचेची रक्कम घेऊन कुडाळ-वेगुर्ला रस्त्यावरील रेल्वे ब्रिजजवळ येण्यास सांगितले. ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तलाठी जितेंद्र खेताडे यांना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

​या यशस्वी कारवाईनंतर आरोपी लोकसेवक जितेंद्र काळू खेताडे यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक श्रीम. संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search