वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून ‘वाइल्ड कोकण सावंतवाडी’ या संस्थेच्या पुढाकाराने सावंतवाडी येथील प्रसिद्ध नरेंद्र डोंगरावर एका विशेष पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये निसर्ग आणि पक्षीप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संपूर्ण कार्यक्रमात एकूण ३४ पक्षीमित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवत परिसरातील जैवविविधतेचा अनुभव घेतला.
सकाळी सात वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंतच्या वेळेत हे पक्षी निरीक्षण करण्यात आले. या अडीच तासांच्या कालावधीत सहभागी झालेल्या सर्व पक्षीप्रेमींनी नरेंद्र डोंगरावरील विविध भागांत भ्रमंती करत पक्ष्यांच्या हालचाली टिपल्या. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या उपक्रमात पक्षीमित्रांना अनेक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण पक्षी पाहण्याची संधी मिळाली.
या पक्षी निरीक्षण मोहिमेदरम्यान एकूण २१ वेगवेगळ्या पक्षी प्रजातींची यशस्वीरीत्या नोंद करण्यात आली. यामध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्र गरुड, सोनेरी रंगाचा हळद्या, पिवळ्या कंठाची चिमणी (सलीम अलीस स्पॅरो), ब्राँझ ड्रॉन्गो (कोतवाल), ॲशी ड्रॉन्गो, आणि येलो ब्राँड बुलबुल यांसारख्या पक्ष्यांचा समावेश होता. याशिवाय ब्राऊन चिक फुलवेता, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, क्रिमसन बॅक सनबर्ड, हेडेड बुलबुल, भारद्वाज, लाल गालाचा शिपाई बुलबुल, काळटोप हळद्या, मलबार फ्लेम बॅक, हार्ट स्पॉटेड वूडपेकर, ऑरेंज मिनिवेट आणि स्मॉल मिनिवेट या पक्ष्यांचेही दर्शन उपस्थितांना घडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाइल्ड कोकण संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर आणि सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवृत्त वन अधिकारी सुभाष पुराणिक, रवींद्र ओगले, अनंत बडे, नंदन बिरोडकर आणि रविकांत चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे सिद्धेश नाईक, ओमकार गावकर, प्रज्ञा गावकर, चैतन्य अडवलकर, वनश्री दोडामार्गचे अनुराग सिनारी, तुषार देसाई, पक्षीतज्ज्ञ प्रवीण सातोसकर, अश्वेक गवस, सुरज गावडे, रोहित परब, तन्वी वैद्य, यथार्थ खवणेकर, जानकी राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. अतुल बोद्रे, नवसो परब, ऋषिकेश सावंत, मनाली पारसेकर, कृपा परब, अथर्व बोद्रे व श्लोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र डोंगर हा परिसर जैवविविधतेने अत्यंत समृद्ध असून येथे विविध प्रजातींचे पक्षी सातत्याने आढळून येतात, यावर या उपक्रमातून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.


