पुण्यातील राजगड खोऱ्यातील निगडे बुद्रुक येथे शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक अजब आणि दुर्मिळ घटना घडली. कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक आकाशातून १५ ते २० किलो वजनाचा एक मोठा पांढरा बर्फाचा गोळा जमिनीवर वेगाने येऊन कोसळला. हा गोळा टोमॅटोच्या शेतात पडला असून, त्याचा जमिनीवर आदळण्याचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसर क्षणभर हादरून गेला.
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी शेतात महेश पवार आणि दत्तात्रय कुडले हे दोन शेतकरी काम करत होते. बर्फाचा गोळा ज्या ठिकाणी पडला त्यापासून हे शेतकरी अवघ्या ५० फूट अंतरावर होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे ते दोघेही चक्रावून गेले, मात्र सुदैवाने ते सुरक्षित राहिले आणि मोठा अपघात टळला. या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही प्रचंड आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत बर्फवृष्टी किंवा ढगफुटीचे प्रकार घडणे स्वाभाविक मानले जाते; परंतु, अजिबात पाऊस नसताना आणि कडक ऊन असताना अशा प्रकारे आकाशातून बर्फाचा गोळा पडणे ही अत्यंत दुर्मिळ बाब असल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हवामानतज्ज्ञ डॉ. एस. बी. सानप यांच्या मते, बर्फ पडल्यास तो एकाच विशिष्ट ठिकाणी अशा प्रकारे पडत नाही आणि ही घटना निसर्गाच्या सामान्य नियमांपेक्षा वेगळी आहे.
या घटनेनंतर स्थानिक शेतकरी रोहिदास पिलाणे यांनी प्रशासन व हवामान विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे. राजगड तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करून तज्ज्ञांमार्फत वस्तूची तपासणी केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर पोहोचता येणार नाही असे स्पष्ट केले आहे.
तालुका कृषी अधिकारी सुनील ईडोळे पाटील यांनी ही घटना हवामान बदलाच्या जागतिक परिणामांशी संबंधित असावी अशी शक्यता वर्तवली आहे. याबाबत हवामान खाते आणि पर्यावरण विभागाला अधिकृत माहिती देण्यात आली असून, या घटनेमागील नेमके वैज्ञानिक कारण काय आहे, हे शास्त्रीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


