मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकट आणि आधुनिक बनवण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, आगामी ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीद्वारे २५ अत्याधुनिक विद्युत बसचा ताफा दाखल होणार आहे. ‘ब्लेड बॅटरी’ तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या नेक्स्ट-जनरेशन बसमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि गतिमान होणार आहे.
या नाविन्यपूर्ण बसमध्ये ‘लिथियम आयर्न फॉस्फेट’ बॅटरी थेट बसच्या चेसिसमध्ये बसवण्यात आली आहे, ज्यामुळे ही बॅटरी सध्याच्या वातानुकूलित ई-बसपेक्षा तब्बल ३० टक्के अधिक ऊर्जा साठवू शकते. परिणामी, या बस एकाच चार्जवर सलग दोन दिवसांपर्यंत विनाअथक धावण्यास सक्षम असणार आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार केल्यास, ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान जगातील सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. अत्यंत प्रतिकूल हवामानात किंवा अपघाताच्या प्रसंगी बॅटरीचे नुकसान झाले तरीही यामध्ये उष्णता अतिशय संथ गतीने निर्माण होते आणि प्राणवायूची निर्मिती होत नसल्यामुळे आग लागण्याचा धोका नगण्य असतो.
या बस पूर्णपणे चार्ज करण्यासाठी केवळ दोन ते अडीच तासांचा अवधी लागतो, ज्यामुळे चार्जिंग केंद्रांवर गाड्यांचा रेंगाळणारा वेळ वाचतो आणि त्या जलद गतीने प्रवाशांच्या सेवा देण्यासाठी रस्त्यावर उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानामुळे बॅटरी पॅकची सुमारे ५० टक्के जागा वाचते, परिणामी बसचे वजन कमी होऊन अंतर्गत प्रवासी क्षमता वाढण्यास मोठी मदत होते.
लंडन आणि सिंगापूरसारख्या जागतिक पातळीवरील शहरांमध्ये यशस्वीरित्या वापरले जाणारे हे तंत्रज्ञान आता मुंबईत येत आहे. पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत या लांब आणि पातळ पट्टीसारख्या दिसणाऱ्या बॅटऱ्या ५ हजारांपेक्षा जास्त चार्जिंग सायकल्स सहज सहन करू शकतात, ज्यामुळे बसचा देखभाल आणि ऑपरेटिंग खर्च मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.


