रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे ही अत्यंत सुन्न करणारी दुर्घटना घडली आहे. येथील स्थानिक रहिवासी जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या मुलांसह खाडीकिनारी कालवे काढण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. आई आपल्या कामामध्ये मग्न असताना मुले खेळत खाडीच्या पाण्यात उतरली.
पाण्याच्या खोलीचा आणि खोलगट खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे पाचही मुले अचानक पाण्याच्या प्रवाहात बुडू लागली. मुलांच्या आरडाओरडानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत खाडीत उड्या घेतल्या. स्थानिकांच्या धाडसामुळे एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, मात्र इतर चार मुलांना वाचवता आले नाही.
या भीषण दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर, जुहेरिया जुनेद भाटकर, बुशिरा जुनेद भाटकर आणि माहिरा जुनेद भाटकर या चार भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मदतकार्य राबवून आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, एका मुलीचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छىमार व प्रशासन प्रयत्न करत आहेत.
डोळ्यांसमोर खेळणारी आपली चारही लेकरे एकाच वेळी दुर्दैवाने गमावल्यामुळे आई-वडिलांनी केलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण नाणार परिसर आणि राजापूर तालुक्यात प्रचंड शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.


