वाढदिवसाचा केक तलवारीने कापून आणि त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी केज पोलिसांनी दोघा तरुणांना अटक करत त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत.
केज शहरात ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अजय अशोक तांदळे याने आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या सेलिब्रेशनदरम्यान त्याने सुरीऐवजी थेट तलवारीचा वापर करून केक कापला. हा प्रकार केवळ आनंदापुरتا मर्यादित न ठेवता परिसरात दहशत पसरवण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आला होता.
या कृत्याचा व्हिडिओ आरोपींनी ‘क्रिश पांचाल’ नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी तातडीने पावले उचलत डीबी पथकाला कठोर कारवाईचे आदेश दिले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी अजय तांदळे आणि त्याचा साथीदार सदाशिव नामदेव आंधळे यांच्या विरोधात शस्त्र प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोबाइल लोकेशनचा अचूक मागोवा घेत ९ ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या घरातून एक तलवार आणि दोन खंजीर अशी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.
या दोन्ही आरोपींना न्यायालयात२ हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा नियमांचे उल्लंघन करून सोशल मीडियावर रील व व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर बडगा उगारला जाईल, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.


