राज्यात पहिल्यांदाच महामार्गाच्या सफाईसाठी ‘मेकॅनाइज्ड रोड स्वीपर’चा वापर

   Follow us on        

​चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि गोविंदपूर या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या ५६.१८० किलोमीटर लांबीच्या चारपदरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी वर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते स्वच्छतेचा एक अभिनव प्रयोग हाती घेण्यात आला आहे. महामार्गावर साचणारी धूळ, माती आणि कचरा झपाट्याने साफ करण्यासाठी ‘मेकॅनाइज्ड रोड स्वीपर’ या यंत्राचा वापर केला जात असून, महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती समोर आली आहे.

​या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी क्लिअर रोड मार्किंग, दिशादर्शक फलक, क्रॅश बॅरिअर, पथदिवे, तसेच आपत्कालीन मदतीसाठी १०३३ हा हेल्पलाइन क्रमांक आणि रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी टोल प्लाझाजवळ रेस्टॉरंट व कॅफेची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

​हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी एलिव्हेटेड रस्ते, भुयारी मार्ग आणि विशेष सूचना फलक उभारण्यात आले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी वाहनांच्या प्रकाशाचा त्रास टाळण्यासाठी मध्यभागी वृक्षारोपण करण्यात आले असून, झाडांच्या संवर्धनासाठी प्रत्येक दहा किलोमीटरवर बोअरवेल आणि पाणी साठवण्यासाठी १२० ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली आहे.

​रस्त्याची निर्मिती करताना नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून ५५ हजारांहून अधिक रोपांची लागवड किंवा पुनर्लागवड करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमधील दळणवळण अधिक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनण्यास मोठी मदत मिळत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search