त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी खासगी हेलिकॉप्टर सेवा प्रस्तावित

   Follow us on        

आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथे हेलिपोर्ट सुविधा विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान उभारण्यात आलेल्या तीन हेलिपॅडचा भविष्यात वापर करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. या सुविधेचा विस्तार करून खासगी विमानसेवा व हेलिकॉप्टर ऑपरेटरच्या सहकार्याने भाविकांना सशूल्क दर्शन पॅकेज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

​या प्रस्तावित योजनेमुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, सुरत, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर अशा प्रमुख शहरांतून अवघ्या ४० ते ५० मिनिटांच्या हवाई प्रवासात भाविकांना थेट त्र्यंबकेश्वर गाठणे शक्य होणार आहे. या सेवेसाठी सहा ते आठ प्रवाशांची क्षमता असलेली हेलिकॉप्टर्स वापरण्याचे प्रस्तावित असून, संपूर्ण प्रवासादरम्यान भाविकांची सोय लक्षात घेऊन हे नियोजन केले जात आहे.

​हेलिकॉप्टरच्या प्रवासासोबतच भाविकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्थाही आखण्यात येत आहे. हेलिपॅडपासून त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच कुशावर्त तीर्थापर्यंत भाविकांना सहज पोहोचता यावे, यासाठी स्थानिक टॅक्सीचालकांशी समन्वय साधून वाहतूक सेवा जोडली जाणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ वाचण्यासोबतच स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

​खासगी ऑपरेटर्सला दिलेल्या प्रस्तावानुसार, हवाई प्रवास, स्थानिक वाहतूक आणि सुमारे अडीच हजार रुपयांच्या प्रवेशपत्रासह दर्शनाची सुविधा असे संपूर्ण पॅकेज देऊन अवघ्या चार तासांत त्र्यंबकेश्वर दर्शन घडवण्याचे नियोजन आहे. ही सेवा प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत भाविकांची गर्दी नियोजनबद्ध रीतीने हाताळण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते.

​सद्यःस्थितीमध्ये या प्रस्तावाला खासगी हेलिकॉप्टर चालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास येत्या २ नोव्हेंबरपासून ही सेवा प्रातिनिधिक स्वरूपात सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी कुंभमेळ्यात भाविकांचा प्रतिसाद उत्तम राहिल्यास, ही हवाई दर्शन सेवा कुंभमेळ्यानंतरही कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाणार आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search