ऑनलाईन गेमिंगसाठी घेतलेले कर्ज वाढल्याने घेतला टोकाचा निर्णय
Follow us onसावंतवाडी तालुक्यातील सातार्डा-रायाचेपेढ येथील रहिवासी असलेल्या मायलेकाने त्यांच्या घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर असलेल्या तेरेखोल नदीपात्रात शनिवारच्या रात्री टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. श्रुतिका श्यामसुंदर आरोदेकर (वय ६३) आणि त्यांचा मुलगा तुकाराम उर्फ सुहास श्यामसुंदर आरोदेकर (वय २७) अशी या दुर्दैवी घटनेतील मृत मायलेकांची नावे आहेत. रविवारी सकाळी नदीच्या काठावर या दोघांची चप्पल आणि बॅटरी आढळल्यामुळे ही खळबळजनक घटना उजेडात आली.
ही घटना समजताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केककर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुपարपर्यंत कोणतीही आपत्कालीन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास बराच विलंब झाला. यावरून जिल्ह्यात आपत्कालीन रेस्क्यू टीम किंवा आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याची बाब समोर आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अखेरीस पोलीस पाटील, जि.प. व पं.स. सदस्य आणि सरपंचांच्या सहकार्याने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने संयुक्त शोध मोहीम राबवण्यात आली.
आरंभी गोवा व सावंतवाडी पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मृतदेह पाण्यामध्ये आतमध्ये असल्याने तो सहजपणे निदर्शनास येत नव्हता. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ राऊळ यांनी मायलेकाने ज्या ठिकाणी उडी घेतली होती, तिथे गळ टाकून शोध घेतला असता दोन्ही मृतदेह गळाला अडकले. हे दोघेही मृतदेह एकमेकांचे हात दोरीने बांधलेल्या स्थितीत पाण्यात आढळून आले, ज्यामुळे ही घटना अत्यंत मन हेलावणारी ठरली.
रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही मृतदेह बाहेर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. मृत आई आणि मुलगा दोघेच एकटी राहत असल्यामुळे त्यांच्या पश्चात कुटुंबात कोणीच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, मृत तरुण सुहास याने ऑनलाईन गेमिंगसाठी मोबाईलवरून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज वाढल्यामुळे आलेल्या तीव्र तणावातूनच या मायेलेकाने आत्महत्येचा हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातार्डा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.


