सावंतवाडीत एमएनजीएल गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक; पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

   Follow us on        

सावंतवाडी शहरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एमएनजीएल घरगुती गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर येणारे बनावट संदेश आणि फोन कॉलद्वारे ओटीपी मागवून नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जात आहेत. या वाढत्या फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

​मागील काही दिवसांपासून शहरात घरगुती गॅस कनेक्शनबाबत विविध मोबाईल संदेश आणि फोन कॉल नागरिकांना येत आहेत. या माध्यमातून नागरिकांकडे गोपनीय ओटीपीची मागणी केली जात असून, या भूलथापांना काही नागरिक बळी पडल्यामुळे सावंतवाडी शहरातील दोन ते तीन जणांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली व पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली जात आहेत.

​सध्या घरगुती गॅस कनेक्शनबाबत कोणतीही अधिकृत सेवा कार्यान्वित करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एमएनजीएल गॅस कनेक्शनबाबत येणाऱ्या कोणत्याही अनտोळखी कॉल किंवा मेसेजवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही अनओळखी व्यक्तीला आपला ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड तपशील किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नये, असे बजावण्यात आले आहे.

​गॅस कनेक्शन सुरू किंवा बंद करण्याच्या नावाखाली कोणीही पैसे किंवा ओटीपी मागितल्यास त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा अनओळखी अ‍ॅप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करणे टाळावे. अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा किंवा आमिषाबाबत स्थानिक कार्यालयात जाऊन खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना किंवा धमक्यांना न जुमानता पूर्ण सतर्कता बाळावावी, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे. दरम्यान, जर कोणी सायबर गुन्ह्याला बळी पडले तर त्यांनी तात्काळ ‘१९३०’ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा www.Cybercrime.Gov.In या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search