मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील वाहतुकीसाठी नवीन नियमावली जाहीर; या वाहनांना प्रवेशबंदी

   Follow us on        

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील जोड रस्त्यावरून (कनेक्टिंग लिंक) प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुव्यवस्थित ठेवण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस प्रशासनाने एक महत्त्वाची कायमस्वरूपी नियमावली जाहीर केली आहे. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांच्या मान्यतेने ही वाहतूक नियमावली लागू करण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाने २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

​या नवीन अधिसूचनेनुसार, १ नोव्हेंबरपासून कनेक्टिंग लिंकवर केवळ खाजगी व बिगर-व्यावसायिक हलकी वाहने म्हणजेच कार आणि प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेसनाच प्रवेश दिला जाईल. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी निश्चित वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ज्यामध्ये हलक्या गाड्यांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर प्रवासी बसेससाठी ताशी ८० किलोमीटर अशी कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल; मात्र वेगातील तफावत निश्चित मर्यादेच्या ५ टक्क्यांपर्यंत असल्यास ती विचारात घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

​माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना या नव्या नियमांमुळे या जोड रस्त्याचा वापर करता येणार नाही. यामध्ये पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या लहान मालवाहू गाड्यांचाही समावेश आहे. या सर्व लहान-मोठ्या मालवाहू वाहनांना जोड रस्त्याऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मूळ आणि जुन्याच मार्गिकेचा वापर करावा लागणार आहे.

​त्याचप्रमाणे, ज्वलनशील, स्फोटक, रासायनिक किंवा कोणत्याही प्रकारच्या धोकादायक साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कनेक्टिंग लिंकवरून जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा धोकादायक वाहनांमुळे होणारे संभाव्य अपघात आणि धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे.

​उल्लेखनीय आहे की, या महत्त्वाकांक्षी कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १ मे पासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता प्रवाशांचा सुरक्षित प्रवास आणि वाहनांची वर्गवारी विचारात घेऊन प्रशासनाने वेगमर्यादा व प्रवेशाचे नियम निश्चित करत या नियमावलीला कायमस्वरूपी स्वरूप दिले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search