मुंबई आणि कोकणादरम्यान धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची सतत वाढणारी गर्दी आणि तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने या मार्गावर मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावर ८ डब्यांऐवजी थेट १६ डब्यांची (16-Car Rake) वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी दुप्पट आसने उपलब्ध होणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य यांत्रिक अभियंता कार्यालयाने (CSMT, मुंबई) जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार (दिनांक ३० ऑक्टोबर २०२६) या नव्या योजनेची अंमलबजावणी १० नोव्हेंबर २०२६ पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या आणि सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची तुफान गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मध्य रेल्वेचा हा निर्णय अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
नियोजनानुसार, माटुंगा वर्कशॉपमध्ये नियमित दुरुस्ती व देखभाल (SS-II maintenance) पूर्ण झालेला १६ डब्यांचा नवीन रेक ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बाहेर पडेल. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२६ रोजी वाडीबंदर (WB) कोचिंग डेपो येथे या १६ डब्यांच्या ट्रेनची प्राथमिक तपासणी आणि सुरक्षिततेची चाचणी (trial) पूर्ण केली जाईल. ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नवीन १६ डब्यांची गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
या वेळापत्रकानुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मडगाववरून रात्री १०:३० वाजता प्रवास पूर्ण केल्यानंतर सध्याची ८ डब्यांची (VB Rake-19) वंदे भारत ट्रेन सेवेतून मागे घेतली जाईल. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०५:२५ वाजता मुंबई CSMT येथून सुटणाऱ्या ट्रेन नंबर २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हा १६ डब्यांचा नवा रेक अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल आणि ती मडगावच्या दिशेने रवाना होईल.
दरम्यान, मडगाव मार्गावरून मोकळी झालेली ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन (VB Rake-19) नागपूर विभागाकडे पाठवली जाणार असून, ११ नोव्हेंबर २०२६ पासून ती नागपूर-सिकंदराबाद (NGP-SC) वंदे भारत एक्सप्रेस म्हणून सेवेत दाखल होईल. तर नागपूर-सिकंदराबाद मार्गावरील जुनी गाडी (VB Rake-35) दुरुस्तीसाठी माटुंगा वर्कशॉपमध्ये पाठवली जाईल. या रेक अदलाबदलीमुळे (Rationalisation) मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर गाड्यांची उपलब्धता अधिक सक्षम आणि सुरळीत होणार आहे.


