राजापुरात सापडले छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र आणि ४०० वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज

   Follow us on        

राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाईक-सरदेसाई घराण्याशी संबंधित इ.स. १६६८ ते १७६५-६६ या कालखंडातील अत्यंत दुर्मिळ कागदपत्रे नुकतीच संशोधकांसाठी उपलब्ध झाली आहेत. डोंगर येथील रहिवासी दीपक शेलार यांनी ही ऐतिहासिक कागदपत्रे मंदिर व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांच्याकडे सुपूर्द केली. नाशिक येथील शासनमान्य मोडी लिपी वाचक रामनाथ रावळ यांनी या कागदपत्रांचे यशस्वी वाचन केले असून, यामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे आज्ञापत्र, रामचंद्रपंत अमात्य यांचा पत्रव्यवहार, जमीनवाटप, बागायती शेतीचा विकास, वतनहक्काचे विवाद आणि दत्तकविधानाच्या अधिकृत नोंदींचा समावेश आहे.

​या संग्रहातील सर्वोत्कृष्ट व सर्वात जुना दस्तऐवज इ.स. १६६८ मधील असून तो नरसोवा नाईक सरदेसाई यांना मिळालेला कौलनामा आहे. पडिक जमिनी लागवडीखाली आणणे, नारळाच्या बागांची निर्मिती करणे आणि ठराविक कालावधीनंतर महसूल जमा करणे अशा विविध अटींचा त्यात उल्लेख आहे. या दस्तऐवजावरून तत्कालीन शिवशाही व मराठा राजवटीत कृषी सुधारणा आणि बागायती विकासाला शासनाकडून किती मोठे प्रोत्साहन दिले जात होते, हे स्पष्ट होते.

​इ.स. १६९४ च्या छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञापत्रात कान्होबा नाईक बिन नरसोवा नाईक यांच्या सरदेशमुखी वतनहक्काचा सविस्तर उल्लेख आढळतो. सरदेसाई घराण्यातील अंतर्गत वतनविभागणीचा वाद आणि प्रभावळी व संगमेश्वर परिसरातील सरदेशमुखीच्या वारसाहक्काबाबत थेट छत्रपतींकडे न्याय मागण्यात आला होता. या पत्रावरून स्थानिक वतनदारांमधील वादांवर मध्यस्थी करून राजसत्ता कशी न्यायनिवाडा करत असे, याचे उत्कृष्ट उदाहरण समोर येते. तसेच इ.स. १७१० च्या सुमारास रामचंद्रपंत अमात्य यांनी देवळे-देवरुख आणि मिठगवाणे परिसरातील अधिकाऱ्यांना पाठवलेला पत्रव्यवहारही या संग्रहात आढळतो.

​तसेच इ.स. १७६५-६६ दरम्यान नरसोवा नाईक सरदेसाई यांच्या निधनानंतर पुत्रसंतान नसल्याने त्यांच्या पत्नी गोपिकाबाई यांनी रामाजी नाईक यांना दत्तक घेतले होते. सरदेसाई वतनाचा वारसा अबाधित राखण्यासाठी त्यांनी विजयदुर्गचे सुभेदार कृष्णाजी विश्वनाथ यांच्याशी पत्रव्यवहार करून धार्मिक व प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे प्रयत्न केले होते. याशिवाय मौजे डोंगर येथील खोतीव्यवस्था, बागांचे उत्पन्न, थकबाकी, दोन हजार रुपयांचे हिशेब तसेच वेठबेगार आणि फारफर्मास यांसारख्या तत्कालीन सामाजिक व आर्थिक प्रथांचे महत्त्वपूर्ण उल्लेख या कागदपत्रांमध्ये नोंदवलेले आहेत.

​राजापूर, प्रभावळी, दाभोळ, संगमेश्वर आणि विजयदुर्ग या संपूर्ण परिसराच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासासाठी हा कागदपत्रांचा संग्रह अत्यंत मोलाचा मानला जात आहे. पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाने यांच्या मते, अशा प्रकारच्या जुन्या सनदा, कौलनामे आणि मोडी पत्रव्यवहाराचे जतन करून त्याचे शास्त्रशुद्ध वाचन केल्यास कोकणच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय इतिहासाला एक नवी दिशा मिळेल आणि मध्ययुगीन इतिहासाचे अनेक महत्त्वाचे दुवे जोडले जातील.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search