​दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सदरम्यान दुर्घटना; अंबरनाथमधील महिला पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण येथील प्रसिद्ध दांडी समुद्रकिनाऱ्यावर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बनाना राईड (Banana Ride) करत असताना समुद्राच्या पाण्यात पडल्यामुळे मुंबईजवळील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण मालवण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबाग येथील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही उत्साहात साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

​दांडी समुद्रात बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली. त्या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्थानिक यंत्रणा आणि कुटुंबियांनी त्यांना तातडीने पाण्याच्या बाहेर काढले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार (First Aid) केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी शीतल यांची तपासणी केली, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषित केले. आनंद घेण्यासाठी आलेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search