खेड: गणेशोत्सव तसेच इतर सणासुदीच्या काळात दिवा स्थानकावरून सुटणाऱ्या विशेष ‘दिवा-चिपळूण मेमू रेल्वे’ सेवेचा विस्तार करावा आणि ती थेट दिवा ते संगमेश्वर मार्गावर सुरू करण्यात यावी, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात कोकण रेल्वेला एक रीतसर निवेदनही देण्यात आले आहे. ही मेमू सेवा भविष्यात संगमेश्वरपर्यंत सुरू झाल्यास कामथे, सावर्डे, आरवली, कढवई तसेच परिसरातील प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
विशेषतः गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात गावी ये-जा करताना चाकरमान्यांना व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवेळा प्रवाशांना प्रचंड गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच या भागातील अनेक नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबई व उपनगरांकडे नियमित प्रवास करत असतात. त्यामुळे या मार्गावर एक स्वतंत्र मेमू सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे.
दिवा-संगमेश्वर मेमू सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होण्यास मदत होईल. शिवाय सणासुदीच्या काळात तसेच नियमित दिवसांमध्येही या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्याने या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. प्रवाशांच्या हिताचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.


