मडगाव-पनवेल स्पेशल गाडीच्या डब्याला भीषण आग; घातपाताचा संशय

   Follow us on        

मडगाव, ता. २९: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी एका मोठ्या दुर्घटनेत मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला दुपारी २:५० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही गाडी पनवेलच्या दिशेने रवाना होणार असल्याने स्थानकाच्या आउटर ट्रॅकवर उभी करण्यात आली होती. अचानक इंजिनलागतच्या डब्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघू लागल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत १४ अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता एवढी मोठी होती की ती काही वेळातच नियंत्रणाबाहेर गेली आणि यात रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, घटना घडली तेव्हा गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

​आग इतर डब्यांपर्यंत पसरू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलत आग लागलेला डबा इतर डब्यांपासून वेगळा केला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी तात्काळ बंद करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानक परिसरात अग्निशमन बंबाला थेट आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. अखेर जवानांनी ईएसआय इस्पितळासमोरील जागेत अग्निशमन बंब उभे केले आणि तेथून लांब पाईप्स जोडून पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

​दरम्यान, प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून, ती कोणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेत घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे नेमके आणि अधिकृत कारण स्पष्ट होईल.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search