रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या मार्गावर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात कोकण रेल्वेने ९३४ तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या कारवाई दरम्यान तब्बल ३७,००० विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २.९० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक वर्ष २०२५-२६ या संपूर्ण वर्षभरात रेल्वेने एकूण ११,३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या वर्षभराच्या मोहिमेत ४,९९,६७५ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २७.६८ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आगामी उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता, कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर ही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून अधिकृत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि त्रासमुक्त होईल. कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकिटासह सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror App’ डाऊनलोड करावे, असेही रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.


