बांदा: गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील महिला, लहान मुले आणि तरुणांना स्थानिक मद्यपींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २५ मे रोजी युवासेनेने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे तीव्र आंदोलन छेडले. युवासेना पदाधिकारी सुरज परब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुख्य महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही राज्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मारहाणीच्या या गंभीर घटनेनंतर गोवा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडूनही कोणतीही दाद मिळाली नाही. प्रशासनाच्या आणि गोवा पोलिसांच्या याच उदासीनतेमुळे आंदोलकांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, असा आरोप सुरज परब यांनी केला आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे गोव्याच्या बाजूने पेडणेपर्यंत तर महाराष्ट्राच्या बाजूने बांद्यापर्यंत वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. “गोव्याची गाडी पुढे जाऊ देणार नाही” या भूमिकेवर आंदोलक ठाम असल्याने आता या प्रकरणात गृहखात्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Photo Credit – AI


