शक्तीपीठ महामार्ग कोकण, गोव्यादी प्रमुख रस्ते व बंरदरांशी जोडण्यासाठी पुर्नसर्वेक्षणाची मागणी करण्यात आली असून, सावंतवाडी रेल्वे टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
Follow us onसावंतवाडी: शक्तीपीठ महामार्ग उत्तर व दक्षिण गोवा, रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण एक्सप्रेस महामार्ग आणि सागरी महामार्गाशी जोडला जावा, यासाठी पुर्नसर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरात लवकर सर्वेक्षण होऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोकणसह राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला असून याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.
मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याकडे ही मागणी मांडण्यात आली असून त्यांनी पुर्नपाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. बांदा भागातील शेतकऱ्यांचा विरोध आणि फळबागायतींचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मार्गात बदल प्रस्तावित करण्यात आला असून, नव्या आराखड्यानुसार आंबोली, चौकूळ पठार, मोर्ले-पारगद व तिलारी मार्गे हा महामार्ग उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडला जाईल. यामुळे चौकूळ व दोडामार्ग तालुकाही मुख्य प्रवाहात येईल.
नवीन रचनानेत चौकूळ हे उंचीवरील शेवटचे गाव जोडले जाईल आणि तेथून हा मार्ग दोडामार्ग तालुकային जोडला जाऊन तेरवण मेढे, मोर्ले पारगद ते कोनाळकट्टा मार्गे किंवा मुख्य रस्त्याद्वारे गोव्याला कनेक्ट होईल. तसेच आंबोली आणि चौकूळ पठाराला जोडणारा हा मार्ग मोर्ले पारगद रस्त्याद्वारे दोडामार्ग-तिलारी मार्गे नॉर्थ व साऊथ गोव्याशी कनेक्ट होईल. याव्यतिरिक्त, कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विधानसभा मतदारसंघातील वीज व्यवस्था बळकट करण्यासाठी इन्सुली ते आडाळी एमआयडीसीपर्यंत महत्त्वाची वीज वाहिनी टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये ८९ नवे उद्योग येणार असल्याने वीज वितरण व्यवस्था सक्षम केली जात असून, या कामात अडचण आल्यास संवाद साधून मार्ग काढला जाईल, अन्यथा गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या भागात ५६ टक्के ग्रीन कव्हर असल्याने वादळात वीज खंडित होते, यावर उपाय म्हणून हायवेद्वारे ११५ कोटी रुपयांची अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठवण्याच्या आदेश ऊर्जा राज्यमंत्री ना. बोर्डीर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. दोडामार्ग येथील कमी व्होल्टेजची समस्या सोडवण्यासाठी निरंतर वीज योजनेअंतर्गत ८० ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आदेश दिले असून, गणेशोत्सवापूर्वी ही कारवाई पूर्ण होईल. आंबोली व चौकूळ गावांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी आणि ब्रेकर्स मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


