सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नाव देणे आणि नव्या ट्रेन सुरू केल्याबद्दल राज्य सरकार व लोकप्रतिनिधींचे आभार मानत, टर्मिनसचे अपूर्ण काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्र शासनाकडून मिळालेल्या १५०० कोटींच्या ‘पीएम गतिशक्ती’ निधीतून सावंतवाडी टर्मिनसचे काम तत्काळ पूर्ण करून ते कोकणवासियांच्या सेवेत दाखल करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
Follow us onराज्य शासन, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने सावंतवाडी टर्मिनससाठी नवी सीएसटी – सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली असून ती नुकतीच सुरू झाली आहे. याशिवाय मंगळूर एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या सावंतवाडीकरांना मिळाल्या आहेत. कोकण रेल्वेच्या शिल्पकारांना शासनाने दिलेली ही मानवंदना कौतुकास्पद असून, सावंतवाडी स्थानकाला ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नाव जाहीर केल्याबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य शासन, खासदार नारायण राणे, खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार सुलभाताई गायकवाड आणि आमदार दीपक केसरकर यांचे जाहीर आभार मानले.
परंतु, एकीकडे नवीन रेल्वे गाड्या आणि नामकरणाचा निर्णय झालेला असतानाच, प्रत्यक्ष सावंतवाडी टर्मिनसच्या अपूर्ण कामांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी संघटनेने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम नक्की कधी पूर्ण होणार? ते अजुनही वेटिंगवर का ठेवण्यात आले आहे?” असा परखड सवाल मिहीर मठकर यांनी उपस्थित केला आहे. स्थानकाला नाव दिले गेले असले तरी त्या नावाला शोभेल असे सर्वसुविधायुक्त टर्मिनस अजूनही प्रत्यक्षात साकारलेले नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
टर्मिनसचे काम पूर्ण न झाल्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. सध्या नवीन प्लॅटफॉर्मची उभारणी करणे आणि तिलारी आंतरराज्य योजनेअंतर्गत टर्मिनसला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. या मूलभूत सुविधा वेळेत न मिळाल्यास भविष्यात सावंतवाडीपर्यंत मर्यादित असणाऱ्या नवीन रेल्वे गाड्या येथे येऊ शकणार नाहीत. जोपर्यंत हे पूर्ण क्षमतेचे (फुल फ्लेज) टर्मिनस होत नाही, तोपर्यंत रेल्वे सेवेचा पूर्ण फायदा प्रवाशांना मिळणार नाही, याकडे लक्ष वेधत प्रवासी संघटनेने राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच कोकण रेल्वेला तब्बल १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ‘पीएम गतिशक्ती’ योजनेअंतर्गत मिळालेल्या या मोठ्या निधीचा वापर सावंतवाडी टर्मिनसचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी केला जावा, अशी मागणी केली जात आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन या कामासाठी प्रयत्नशील असताना कोकण रेल्वे प्रशासन या कामात नेमकी कोणती अडकाठी आणत आहे आणि निधी उपलब्ध असतानाही काम का रखडले आहे, असा मोठा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झाला आहे.
कोकण रेल्वेने तातडीने ‘पीएम गतिशक्ती’ योजनेत सावंतवाडी टर्मिनसचा समावेश करून राहिलेली सर्व कामे वेगाने पूर्ण करावीत, असे आवाहन संघटनेने केले आहे. टर्मिनसचा लढा अद्याप संपलेला नसून तो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हा शेवटचा टप्पा लवकरात लवकर पार पाडून सावंतवाडी आणि कोकणच्या जनतेला त्यांच्या हक्काचे पूर्ण क्षमतेचे टर्मिनस मिळवून दिले जाईल, असा ठाम विश्वास मिहीर मठकर यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला प्रवासी संघटनेचे सुभाष शिरसाट, ऋत्विक गवस, रामकृष्ण मुंज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


